‘साउंड ऍन्ड इलेक्ट्रिकल्स जनरेटर असोसिएशन’नेच केला दावा
पुणे – गणेशोत्सव काळात डीजे, लेझर यांच्या अतिरेकामुळे आम्हीही वैतागलो आहोत, असे नियमबाह्य साहित्य विक्री करणाऱ्यांत आमच्या असोसिएशन सदस्य नसलेल्यांचीच संख्या जास्त आहे, त्यामुळे त्यांच्यावर आता पोलिसांनीच नियंत्रण आणावे, अशी मागणी “साउंड ऍन्ड इलेक्ट्रिकल्स जनरेटर असोसिएशन’चे अध्यक्ष बबलू रमजानी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी उपाध्यक्ष शैलेश गायकवाड आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गणेशमंडळे काही विशिष्ट साउंड सिस्टिमची मागणी करतात. व्यावसायिक त्यांची मागणी पूर्ण करताना “प्रेशर मिड’ सारख्या साउंड सिस्टिम्स डिव्हाइस लावतात. या सिस्टिम्स केवळ आपत्कालीन स्थितीत वापरायचा असतात, परंतु उत्सवात त्याच्या भिंती तयार करून लावल्या जात असल्याचे रमजानी यांनी सांगितले.
आमच्या असोसिएशनचे प्रत्यक्षात 400 सभासद आहेत, परंतु या व्यवसायात किमान दोन हजार व्यावसायिक आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही नियंत्रण आणू शकत नाही. याबाबत आम्ही पोलिसांनाही निवेदन दिले आहे. याशिवाय गणेशोत्सवापूर्वी जी बैठक झाली त्यातही याविषयी तक्रार केल्याचे रमजानी यांनी सांगितले.
आमच्या असोसिएशनचे अनेक सभासद पुण्यामध्ये होणाऱ्या मोठ्या राजकीय सभा, संमेलने, सवाई गंधर्व महोत्सव यासारख्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांना सेवा पुरवतात. तसेच, असोसिएशनच्या नियमांचे पालन करून सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतात. गणेशोत्सवातील डीजेतून होणारे ध्वनि प्रदूषण आणि लेझरचा घातक वापर याबाबत असोसिएशनने तीन-चार वर्षांपासून पोलीस आणि प्रशासनाला निवेदने दिली आहेत.
असोसिएशनतर्फे आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आहेत. याकडे पोलीस आणि प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या साउंड आणि इलेक्ट्रिक क्षेत्रातील व्यावसायिकांविषयी सर्वसामान्य लोकांच्या मनात नकारात्मक भूमिका निर्माण होईल, असेही रमजानी यांनी स्पष्ट केले.
मांडलेले महत्त्वाचे मुद्दे…
* पुण्याबाहेरून आलेल्या व्यावसायिकांकडून विक्री
* साउंड सिस्टिममध्ये बदल करून त्याचा वापर
* विमानतळावर वापरल्या जाणाऱ्या लेझरचा वापर