पुणे – शहर स्वच्छतेसाठी महापालिकेकडे तब्बल १७ हजार कर्मचारी असताना शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी शहरात कचर्याचे ढीग साचतात. केवळ कर्मचार्यांच्या सुट्टयांचे नियोजन केले जात नसल्याने ही स्थिती उद्भवत असल्याचे वृत्त दैनिक प्रभातने दिल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरात पाहणी केली. त्यांनाही मोठ्या प्रमाणात कचरा आढळून आल्याने त्यांनी याबाबत घनकचरा विभागाकडे विचारणा करीत नाराजी व्यक्त केली.
कर्मचार्यांच्या सुट्टीचे नियोजन करून शनिवार तसेच रविवारी कचरा साचणार राहणार नाही. याबाबत तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकारी तसेच आरोग्य निरिक्षकांना दिल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सांगितले.
काय होती अडचण…
महापालिकेत कायमस्वरूपी असलेल्या स्वच्छता सेवकांना शनिवार, रविवारसह शासकीय सुट्टीचाही लाभ असल्याने या दिवसांमध्ये शहरातील कचर्याची जबाबदारी ठेकेदारांच्या ४ हजार ८०० कर्मचार्यांवर असते. शिवाय साप्ताहीक सुट्टी तसेच गैरहजर राहण्याचे प्रमाण अधिक असल्याने जेमतेम साडेतीन हजार कर्मचारीच कचरा उचलण्याचे काम करतात. परिणामी, शनिवार आणि रविवारी शहरात कचर्याचे ढीग सचतात.
महापालिकेच्या कायम असलेल्या कर्मचार्यांना शनिवारी तसेच रविवारी सुट्टी असते, तर जोडून सुट्टया आल्यास त्याचाही लाभ मिळतो. अनेकदा या जोडून येणार्या सुट्ट्या शुक्रवार किंवा सोमवारी असतात, त्याचा परिणाम शहरातील कचरा उचलण्याच्या यंत्रणेवर होतो. शहरात दरदिवशी सुमारे २ हजार २०० टन कचरा उचलला जातो, मात्र, सुट्ट्यामुळे शहरात तीन ते चार हजार टन कचरा पडून राहतो.
वाहनांचेही नियोजन…
स्वच्छता कर्मचार्यांना सोबतच महापालिकेच्या कचरा उचलणार्या वाहनांचे चालकही सुट्टीवर असतात. परिणामी, कर्मचार्यांनी कचरा संकलन केला तरी तो वाहतूक न झाल्याने जागेवरच पडून राहतो. त्यामुळे कचरा उचलणार्या कर्मचार्या प्रमाणेच वाहन चालकांच्या सुट्टीचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे, शहरात सुट्टीच्या दिवशीही कचरा उलचला जाणार आहे.