पुणे – पूर्ववैमनस्यातून उत्तमनगर पोलीस ठाण्याचे हद्दीत शिवणे येथे एका तरुणाच्या कारचा गुंडांनी पाठलाग केला. यानंतर त्याच्यावर तब्बल सहा गोळया झाडण्यात आल्या. हा प्रकार रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याचे सुमारास घडला आहे.
या घटनेत केदार शहाजी भालशंकर (24,रा.रामनगर, वारजे,पुणे) या तरुणाचे पाठीस एक गोळी लागून तो जखमी झाला आहे. याप्रकरणी निलेश गायकवाड व त्याचे पाच साथीदार यांचेवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, आर्मस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी केदार भालशंकर याने फिर्याद दिली आहे. या घटनेत केदार याचे पाठीला एक गोळी लागल्याने तो जखमी झाला. परंतु सुदैवाने तो या थरारक पाठलागातून बचावला गेला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीसांना आरोपींची ओळख पटली असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.
… असा घङला थरार
फिर्यादी केदार आणि त्याचे तीन मित्र रविवारी रात्री कात्रज परिसरात जेवणासाठी गेले होते. त्यानंतर कारमधून माघारी परतत असताना एनडीए स्मशानभूमिजवळ दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्याच्या कारची दगड मारुन काच फोडली. अंधार असल्याने केदारने गाडी थोडी पुढे नेऊन थांबवली. त्यानंतर त्याला पाठीमागून दुचाकीवरुन निलेश साथीदारांसह आलेला दिसला. दरम्यान निलेशने केदारच्या दिशेने बेछूट गोळीबार करण्यात सुरवात केली.