पुणे – मंदिरापासून स्वयंपाक घरातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे नारळ. मात्र, यंदा निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा त्यात वाढलेल्या उष्णतेचा फटका नारळाच्या पिकाला बसला आहे. नारळाचे उत्पादन घटले आहे. परिणामी आवक घटली आहे.
त्यातच हॉटेल, रेस्टॉरंट चालकांसह घरगुती ग्राहकांकडून मागणी असल्याने दर्जेदार नारळ चांगलाच भाव खाऊ लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत नारळ नगामागे ६ ते ८ रुपयांनी वाढ झाली आहे. दर्जेदार नारळाची विक्री ५० रुपये भावाने होत आहे. इतर नारळासाठी २५ ते ३० रुपये मोजावे लागत आहेत.
मार्केट यार्डातील भुसार बाजारात तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून आवक होत आहे. मद्रास, साफसोल, नवा नारळ आणि पालकोल नारळाची मिळून बाजारात दररोज दीड हजार ते दोन हजार गोणी आवक होत आहे. यामध्ये, एक हजार नारळामागे सरासरी अवघे २०० नारळ मोठ्या आकाराचे आहेत.
शाकाहारापासून मासांहारी पदार्थ तयार करण्यासाठी हॉटेल, खानावळ, केटरिंग वाल्यांकडून मोठ्या आकाराच्या मद्रास आणि साफसोल नारळाला मोठी मागणी असते. मागणीच्या तुलनेत सध्या या नारळांची आवक कमी असल्याने गतवर्षीच्या तुलनेत मद्रास नारळाच्या भावात शेकड्यामागे ५५० ते ६०० रुपयांनी तर साफसोलच्या भावात ६०० ते ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. नवा नारळ व पालकोलचा वापर खाद्यपदार्थांसाठी कमी होत असल्याने या नारळाचे भाव गतवर्षीच्या तुलनेत टिकून आहे.
नारळाचे तुलनात्मक दर
नारळ ———- शेकडा दर (२०२३)—————शेकडा दर (२०२४)
मद्रास———–२ हजार ५५० ते २ हजार ६००———३ हजार १०० ते ३ हजार २००
साफसोल———२ हजार १०० ते २ हजार ५००———२ हजार ७०० ते ३ हजार ३००
कोणता नारळ कशासाठी वापरतात
बाजारात जवळपास चार प्रकारचे नारळ उपलब्ध आहेत. तामिळनाडूचा नवा नारळ हा धार्मिक विधीसाठी वापरण्यात येतो. हा नारळ आकाराने छोटा व मध्यम असतो. तर, आंध्रचा पालकोल तसेच मद्रास नारळ घराघरांत स्वयंपाकासाठी वापरला जातो. कर्नाटक नारळ आकाराने मोठा व जाड, खोबरे चवीला उत्तम असल्याने हॉटेल व्यावसायिक, खानावळ, केटरिंग व्यवसायाकडून या नारळाला मोठी मागणी राहते.
“दर्जेदार नारळाला चांगली मागणी आहे. मात्र, बाजारात त्याची उपलब्धता कमी आहे. सध्या मद्रास व साफसोल या नारळांच्या भावात वाढ झाली आहे. दि.९ एप्रिलपासून चैत्र महिना सुरू होणार आहे. त्यामध्ये यात्रा, जत्रा असतात त्या कालावधीत अन्य नारळांनाही मागणी वाढेल.” – दीपक बोरा, नारळाचे व्यापारी, मार्केट यार्ड