गणेशमूर्ती खरेदी आणि प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त नियोजन
पुणे – गणपती मूर्ती खरेदी आणि प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंगळवार आणि बुधवारी (दि. 30 आणि 31 ऑगस्ट) मध्यभागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येते. शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा परिसरात “श्रीं’ची मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते.
कसबा पेठेतील डेंगळे पूल ते शिवाजी पूल, कसबा पेठ, जिजामाता चौक, सारसबाग परिसरातील सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात वाहतूक मार्गांत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.
पोलिसांच्या सूचना
शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) परिसरात वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. संचेती चौकाकडून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे. स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. या भागात वाहने लावू नयेत. मुंढव्यातील केशवनगर भागात मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन या भागात वाहतूक बदल करण्यात
आले आहेत.
वाहतुकीस खुले रस्ते
फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज
अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
सोन्यामारुती चौक ते बेलबाग चौक-सेवासदन चौक
मंगला चित्रपटगृहसमोरील प्रीमिअर गॅरेज गल्ली ते
खुडे चौक (डेंगळे पूल)
पीएमपी बस मार्गात बदल
शिवाजी रस्ता- स्वारगेट पीएमपी बस मार्गात बदल करण्यात आला आहे. स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे बस जातील. पालिकेकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.
येथे वाहने उभी करण्यास परवानगी
कामगार पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकादरम्यान एका बाजूला, महापालिका वीजभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौकादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी. टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नदीपात्रातील रस्त्यावर. मंडईतील सतीश मिसाळ वाहनतळ, हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ. शाहू चौक (फडगेट पोलीस चौकी) ते राष्ट्रभूषण चौकादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करण्यास परवानगी असेल.