पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी कॅरीऑन आणि पुरवणी परीक्षेसाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. या वेळी हजारो विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, यासंदर्भात शिखर संस्थांच्या मार्गदर्शनानुसार कायदेशीर सल्ला घेऊन योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. विद्यापीठाच्या २०१९ पॅटर्नच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना एक-दोन विषयांत नापास झाल्यामुळे ‘ईअर डाउन’चा फटका बसला असून, पुन्हा परीक्षेची मागणी एनएसयूआय विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आली. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनकर्ते गेटवर चढले आणि गेट तोडून विद्यापीठात प्रवेश केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या वेळी विद्यार्थी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव अक्षय जैन, विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, रोनक खाबे, महेश कांबळे, राज जाधव, तेजस बनसोड, अभिषेक पवार, सचिन भाडख, वैभव महाडिक, अभिषेक जाधव, रोहित निकम, श्रद्धा डोंड, यश जाधव, साहील चव्हाण आदी उपस्थित होते. ‘जे विद्यार्थी अशी मागणी करत आहेत, ते सर्व विद्यार्थी त्या त्या वर्षात किमान 50 टक्के श्रेयांक प्राप्त करू शकलेले नाहीत. परिणामी नियमानुसार हे सर्व त्या त्या शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने कायदेशीर बाबी, तसेच संबंधित शिखर संस्थांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात येईल.’ – प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ ‘विद्यापीठाने याआधीही विशिष्ट परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, असे निर्णय घेतले आहेत. या वेळीही कायदेशीर सल्ला घेऊन आणि नियमांच्या अधीन राहून निर्णय घेतला जाईल.’ – प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू