pune : विकासाचा रस्ता की विनाशाचा सापळा?
pune :

अभिनव चौकात कोंडीने गुदमरतोय श्वास; कर्वे रस्त्यावर स्थानिक रहिवासी, वाहनचालकांची फरफट
pune : कधीकाळी शांत असलेला कर्वे रस्ता सध्या वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांसाठी मरणयातना देणारा ठरत आहे. एसएनडीटी बसस्टॉप ते कासट पेट्रोल पंप, लॉ-कॉलेज रोड ते अभिनव चौक ते दशभुजा गणपती या संपूर्ण रस्त्यावर रोज सकाळी-संध्याकाळी वाहतूक कोंडीचा विळखा पडत आहे.
वाहनांच्या रांगांमुळे वेळेचा अपव्यय होत असून, कर्णकर्कश हॉर्न आणि विषारी धुरामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे हा विकासाचा रस्ता आहे की विनाशाचा सापळा? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
कर्वे रस्त्यावरील अभिनव चौक म्हणजे पुणे शहराला जोडणारी मुख्य जीवनवाहिनीच आहे. मुंबई, मुळशी, कोथरूड, वारजे आणि कर्वेनगर येथून येणारी लाखो वाहने रोज याच चौकातून शहरात प्रवेश करतात.
दुसरीकडे म्हात्रे पूल, डेक्कन आणि लॉ-कॉलेज रोडकडून येणारी वाहनेही याच मार्गाने शहराबाहेर जातात. मात्र, सकाळ-संध्याकाळच्या पिक अव्हर्समध्ये एसएनडीटी महाविद्यालय ते स्वातंत्र्य चौक आणि लाॅ-काॅलेज रोड ते दशभुजा गणपतीदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ही जीवनवाहिनी अक्षरशः ब्लॉक होत असून, जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या परिसरात शाळा, महाविद्यालय, क्लासेस, विविध संस्था-संघटनांची कार्यालये, शोरूम्स आणि मोठी हॉटेल्स आहेत. गेल्या काही वर्षांत या शांत परिसराला कर्णकर्कश हॉर्न, वाहतूक कोंडी आणि धुराचे ग्रहण लागले आहे. या रोजच्या त्रासाने शालेय मुलांसह दिवसभर काम करून थकलेले चाकरमानी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.
याशिवाय स्थानिक रहिवाशांना ५ मिनिटांच्या कामासाठी बाहेर पडायचे असेल, तर जाण्या-येण्यातच पाऊण तास वाया जातो. यामुळे आता गाडी बाहेर काढायची म्हटले, तरी नागरिकांच्या अंगावर काटा येत आहे. त्यातच धुरांमुळे श्वसनाचे आणि त्वचेच्या तक्रारी वाढत असल्याने स्थानिक नागरिकांनी सांगितले.
एक किमी अंतराला अर्धा तास
लॉ-कॉलेज रोडवरील आठवले चौक ते दशभुजा गणपती हे अवघे एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दुपारी फक्त ५ मिनिटे लागतात. मात्र, संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान याच अंतरासाठी तब्बल अर्धा तास लागत असल्याने ही कोंडी पुणेकरांचा अंत पाहणारी ठरत आहे.
या कोंडीचे मुख्य कारण म्हणजे लॉ-कॉलेज रोड, म्हात्रे पूल आणि डेक्कनकडून येणारी वाहतूक तब्बल पाच लेनने अभिनव चौकाकडे येते. मात्र, पुढे बीएसएनएल कार्यालय ते मलबार ज्वेलर्सदरम्यान रस्ता अरुंद असल्याने या सर्व वाहनांना फक्त एकाच लेनमध्ये यावे लागते. त्यातच पीएमपी आणि खासगी बसेस एकामागोमाग आल्याने वेग आणखी मंदावतो. या अरुंद पट्ट्यात एखादी गाडी बंद पडली, तर थेट चक्का जाम होऊन वाहनचालकांचे हाल होतात.
सुरळीत वाहतुकीसाठी जिथे चार लेन मिळायला पाहिजे, तिथे प्रत्यक्षात एकच लेन मिळते, हा येथील मुख्य अडथळा आहे, तरीही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही लागू बंधू पेढ्याच्या चौकातून येणारी चारचाकी वाहने बंद केली आहेत. ज्यामुळे कोंडी झाली तरी वाहने हळूहळू पुढे सरकत राहतात. अशा कठीण परिस्थितीतही नागरिकांना कमीतकमी त्रास व्हावा, यासाठी सकाळ आणि संध्याकाळच्या दोन्ही सत्रात वाहतूक पोलीस कर्मचारी चौकात आणि मुख्य रस्त्यावर तैनात असतात.
– सुनील गवळी, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, कोथरूड





