Sweeping work: रिझल्ट पाहूनच झाडणकामाचा मुदतवाढ
Sweeping work:

श्रीनाथ भिमाले; येत्या ३० तारखेपर्यंत तीन महिन्यांचा प्रगतीचा अहवाल द्या
Sweeping work: महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहराच्या स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या प्रायोगिक तत्त्वावरील परफॉर्मन्स बेस्ड झाडूकाम उपक्रमाचा रिझल्ट पाहूनच या उपक्रमाला मुदतवाढ द्यायची की नाही, याचा निर्णय घेणार आहोत, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
हा उपक्रम तीन महिन्यांसाठीच प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार येत्या ३० ऑक्टोबरला या उपक्रमाला तीन महिने पूर्ण होत आहेत. त्या तीन महिन्यांचा अहवाल स्थायी समितीने प्रशासनाकडे मागितला आहे.
शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाने नवीन फंडा राबवला. यामध्ये शहर स्वच्छ ठेवण्याची सर्व जबाबदारी ठेकेदारांवर सोपवण्यात आली. जर ठरवून दिलेला भाग स्वच्छ झाला नाही, तर त्याला पूर्णपणे ठेकेदार आणि त्यांनी नेमलेले कर्मचारी जबाबदार असतील, असे ठरवण्यात आले. जेथे कचरा, अस्वच्छता दिसत होती, तेथे अचानक पाहणी करून एका कर्मचाऱ्याचा एक हजार याप्रमाणे विविध कंत्राटदार कंपन्यांकडून सुमारे साडेसहालाख रुपये दंडही वसूल केला.
शहर स्वच्छतेसाठी झाडणकामाच्या ठेकेदारांकडील कर्मचाऱ्यांची संख्या साडेचार हजारांवरून थेट नऊ हजार करण्यात आली. त्यासाठी शहरातील झाडूकामाच्या हद्दी निश्चित करताना प्रत्येक ७०० मी.च्या हद्दीनुसार मनुष्यबळ निश्चित करण्यात आले. मात्र, हद्द निश्चित करण्यापूर्वीच रस्त्यांची अचूक मोजणी आणि वर्गवारी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
परिणामी, सार्वजनिक रस्त्यांसोबत खासगी सोसायट्यांचे अंतर्गत रस्तेही झाडूकामाच्या मॅपिंगमध्ये आले. विशेष म्हणजे, तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या उपक्रमामुळे सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा झाल्याचा दावा बैठकीत करण्यात आला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यात जी काही या विशेष प्रायोगिक उपक्रमाचा शहराच्या स्वच्छतेसाठी उपयोग झाला, त्या सगळ्याचा सद्यस्थिती अहवाल स्थायी समितीने ३० तारखेपर्यंत मागितला आहे. तो अहवाल आल्यानंतर बैठकीत चर्चा करून या उपक्रमाला मुदतवाढ द्यायची किंवा नाही, याविषयी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे भिमाले यांनी सांगितले.





