Travel by private vehicle: खासगी बस, कार प्रवास २० ते २५ टक्के महाग
Travel by private vehicle:

गाड्यांच्या किमतीतील वाढ, डीझेलचे दर वाढल्याने असोसिएशनचा निर्णय
Travel by private vehicle: गाड्यांच्या किमतीत झालेली वाढ, डीझेल आणि अन्य महागाईमुळे बस आणि कारच्या भाडेदरात २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसची दरवाढही लागू होणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाला पाठवला आहे. या वेळी उपाध्यक्ष सुनील मोरे, सचिव तुषार जगताप, खजिनदार दिनेश सोनावणे, किरण देसाई आणि सचिन पंचमुख उपस्थित होते.
या असोसिशनच्या माध्यमातून लग्नकार्ये, धार्मिक यात्रा, सहली, कंपन्यांचे कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. मागील पाच वर्षांत कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नव्हती. मात्र, आता देखभाल-दुरुस्ती, चालकांचे वेतन, आरटीओचे फिटनेस चार्जेस आणि शासकीय ई-चलनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळत नसून, केवळ एसटी महामंडळाकडेच लक्ष दिले जात असल्याचा आरोप संघटनेचे किरण देसाई यांनी केला. सुरक्षेच्या साधनांच्या सक्तीमुळे अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत असल्याने तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तुषार जगताप म्हणाले, मिनी बस आणि टेम्पो ट्रॅव्हलरच्या किमती दुप्पट झाल्या असून, टायर दीडपट, तर ऑइलचे दर ७० ते ८० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे व्यवसाय वाचवण्यासाठी ही दरवाढ क्रमप्राप्त आहे. सरकारने खासगी वाहनांसाठी रिक्षाप्रमाणे अधिकृत दरपत्रक निश्चित करावे, अशी मागणी असोसिएशनने या वेळी केली.
प्रतिकिलोमीटर भाडेवाढ
बसचा प्रकार सध्याचा दर प्रस्तावित
• १७ सीटर : २३ २७ रुपये
• २० सीटर : २५ ३० रुपये
• ३२ सीटर : ३३ ३८ रुपये
• ३५ सीटर : ३६ ४२ रुपये
• ४० सीटर : ४१ ४५ रुपये
• ४५- ४९ सीटर : ४५ ५५ रुपये





