Dengue: डेंग्यूच्या प्रादूर्भावाबाबत महापालिका उदासीन
Dengue:

एका आठवड्यात अहवाल देण्याचे स्थायी समितीने दिले आदेश
Dengue: एका आठ वर्षांच्या लहान मुलीसह दोन जण दगावले, तरी डेंग्यूच्या वाढत्या प्रादूर्भावाबाबत महापालिका प्रशासन उदासीन असून, शहरात डेंग्यूबाधित किती रुग्ण आहेत, याविषयी कोणतीच माहिती महापालिकेकडे नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढच्या स्थायी समितीच्या बैठकीत डेंग्यूसंबंधी अहवाल द्या, असे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.
शहरात डेंग्यूबाधित रुग्ण किती आहेत, किती दगावले, किती अत्यवस्थ आणि गंभीर आहेत, रुग्णालये, पॅथाॅलाॅजी लॅबचे रिपोर्ट्स, या सगळ्याची माहिती महापालिकेकडे नाही. आठ वर्षांची बालिका डेंग्यूने दगावल्यानंतर प्रशासनाला विचारले असता, माहिती घेऊन सांगते, असे उतर आरोग्य विभागप्रमुख डाॅ. नीना बोराडे यांनी दिले होते.
याविषयी स्थायी समितीमध्ये माहिती मागितली असता, आरोग्य विभागाला ती देता आली नाही. त्यामुळे एका आठवड्यात अहवाल द्या, असे आदेश दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
डासांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरात धूर फवारणीही केली नाही, यासाठी प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले. त्यासाठी २६५ जणांची भरती तातडीने करण्याचे आदेशही दिल्याचे भिमाले म्हणाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर रुग्ण वाढत असतील, तर आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अतिरिक्त आयुक्तांनी घेतली तातडीची बैठक
अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना यासंदर्भातील उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोहगावमधील जी आठ वर्षांची मुलगी दगावली आहे, त्यासंदर्भात माहिती घेतली असून, ती कोमाॅर्बिड होती, असे कौर यांनी सांगितले. याशिवाय गोखलेनगर येथील वृद्ध महिलाही डेंग्यूने दगावली आहे. रुग्णांची माहिती सरकारी, खासगी रुग्णालये, दवाखान्यांकडून मागवून घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला कौर यांनी दिले.





