‘कीट’ नसल्याने महिनाभरापासून चाचण्या बंद
कर्करोग रुग्णांच्या अनुवंशिक माहितीसाठी चाचणी
कर्करोगावरील उपचार ठरवण्यासाठी चाचणी गरजेची
रोगाचे कारण शोधण्यासाठी चाचणी महत्त्वपूर्ण
अंजली खमितकर
पुणे – कर्करोगासंबंधी जनुकीय तपासणीसाठी सुरू करण्यात आलेली लॅब “चाचणी किट’ नसल्याने गेल्या महिनाभरापासून बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (एमयुएचएस) पुण्यात अवघ्या वर्षभरापूर्वीच ही लॅब सुरू करण्यात आली असून विशेषत: सरकारी रुग्णालयात दाखल असलेल्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी मोफत जनुकीय चाचणी उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश होता. मात्र, महिनाभरापासून प्रयोगशाळेने “चाचणी किट’च्या कमतरतेमुळे या लॅबमध्ये कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये गणेशखिंड रस्त्यावरील घारपुरे बंगला येथे सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगशाळेत डीएनए, आरएनए, गुणसूत्रे आणि प्रथिने यांच्या विश्लेषणासाठी चाचण्या तसेच बायोकेमिकल, सायटोजेनेटिक, जनुकिय किंवा या पद्धतींचे संयोजन वापरून विशिष्ट चयापचय प्रक्रिया तपासली जाते.
दरम्यान, एप्रिल 2023 पर्यंत प्रयोगशाळेत उपकरणे येण्यास उशीर झाल्यामुळे आणि चाचण्यांसाठी निधी उपलब्धतेच्या कारणातून चाचण्यांवर मर्यादा येत होत्या. या चाचण्या विशेषत: सरकारी रुग्णालयांतील गरीब रुग्णांना मदत करण्यासाठी होत्या, ज्यामुळे कर्करोग पूर्वीचे निदान करण्यात मदत होणार होती. मात्र, आता चाचण्यांसाठी कीट नसल्याने सर्व चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत.
आम्ही चाचणी किटच्या पुढील संचासाठी ऑर्डर दिली आहे. काही कोटेशन्समुळे निविदा पुन्हा काढणार आहोत. याला काही वेळ लागू शकतो. आम्ही फक्त प्रमाणीत किटच वापरतो. भारत सरकारने मान्यता दिली आहे. ही खुली निविदा आहे. खरे तर सीएसआर मार्फत आम्हाला असे किट उपलब्ध होऊ शकते का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– डॉ. अनुराधा चौगुले, जनुकिय ऑन्कोलॉजिस्ट
नमुने थांबवण्याच्या सूचना…
सरकारी रुग्णालयातील ऑन्कोलॉजिस्टने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सर पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्यांमुळे आम्हाला कॅन्सरचे कारण अनुवंशिक आहे की नाही हे समजण्यास मदत होत होती. यानुसार उपचारांबाबत योग्य परिणामकारक निर्णय घेणे शक्य होत होते. प्रयोगशाळेत फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी “एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर’ जनुक चाचण्या आणि रक्ताच्या कर्करोगासाठी “क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया’ चाचण्या करत होते, आम्ही कर्करोगाच्या रुग्णांचे काही नमुने चाचणीसाठी पाठवले होते. मात्र, किटच्या कमतरतेमुळे आम्हाला नमुने पाठवणे थांबवण्यास सांगण्यात आले आहे. ते सुरू झाल्यानंतर आम्हाला कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आत्तापर्यंत लॅबला पुण्यातील काही मोजक्या रुग्णालयांमधूनच नमुने मिळत होते. परंतु, एमयूएचएसने त्यांचे नमुने पाठवण्यासाठी खासगी रुग्णालये तसेच पुणे आणि मुंबईतील सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळू शकतील, असे प्रयत्न आहेत.
– डॉ. सौरव सेन, प्रयोगशाळा प्रभारी