पुणे- नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय शालेय नेतृत्त्व विकास सेंटर मार्फत तयार केलेल्या व औरंगाबाद येथील महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या “शालेय नेतृत्त्व विकास व व्यवस्थापन’ (अभ्यास) प्रशिक्षणासाठी राज्यातील 18 हजार 766 शिक्षकांची नोंदणी झाली.
4 हजार 4 जणांनी कोर्स पूर्ण करुन प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. “मिपा’कडून मराठी भाषांतरित आणि आणि संदर्भीत केलेल्या शालेय नेतृत्त्व विकास व व्यवस्थापन प्रशिक्षणाची सुरुवात दि. 3 डिसेंबर 2020ला झाली होती. हे प्रशिक्षण देशभरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावरील शाळा प्रमुखांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
भविष्यात शाळा प्रमुख होण्यासाठी असलेले ज्येष्ठ शिक्षक या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात. राज्यभरातून या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. नुकताच राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था यांच्याकडून आलेल्या अहवालाप्रमाणे सद्यस्थितीत राज्यभरातून नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.
महाराष्ट्रातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, ज्येष्ठ शिक्षकांनी नोंदणी करून प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन याबरोबरच शालेय सुधारणा आणि परिवर्तन होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावरील शाळा प्रमुख व ज्येष्ठ शिक्षक यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन औरंगाबाद येथील महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या संचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी केले आहे.
नोंदणीसाठी अधिकाधिक शिक्षकांना प्रोत्साहित करण्यात यावे, यासाठी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शालेय नेतृत्त्व व्यवस्थापन ऑनलाइन स्वरूपातील प्रशिक्षण मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत राष्ट्रीय वेब पोर्टलवर उपलब्ध आहे.
त्यासाठी दिलेल्या पोर्टलवर नोंदणी करून स्वतःचे लॉगिन व पासवर्ड मुख्याध्यापकांनी तयार करावे. हे प्रशिक्षण मुदतीत सर्व मुख्याध्यापकांनी पूर्ण करावे. फेसबुक पेज यूट्यूब चॅनेलला लाइक केल्यामुळे आगामी उपलब्ध मार्गदर्शनाबाबत सूचना मिळणार आहेत.
मुख्याध्यापक शिक्षक यांना राष्ट्रीय तसेच राज्य करण्याचे मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे. नोंदणी, लॉगिन निर्मिती व कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य व मदतीसाठी कार्यालयीन वेळेत तज्ज्ञ व्यक्तींनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.