मुंबई – भारतीय वंशाचे लोक जागतीक कंपन्याच्या प्रमुख पदावर नियुक्त केले जात आहेत. त्यावर चर्चा चालू असतांनाच भारतीय वंशाच्या लीना नायर फ्रेंच लक्झरी ग्रुप शनैलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनणार आहेत.
52 वर्षाच्या लीना आतापर्यंत युनिलिव्हरच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. फॅशन क्षेत्रात त्या आतापर्यंत कार्यरत नव्हत्या. आपण नवी जवाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या.
जानेवारी अखेरीस त्या नवी जवाबदारी सांभाळणार आहेत. युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण मुख्य मानव संसाधन अधिकारी लीना यांनी कंपनीतून राजीनामा दिला आहे. आता त्या शनैलमध्ये सीईओ म्हणून रुजू होणार आहेत.
लीना नायर यांचा जन्म 11 जुन 1969 मध्ये कोल्हापुरात झाला. त्यांनी कोल्हापुरच्या होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पूर्ण केले.
त्यानंतर लीनांनी जमशेदपूरच्या झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट (दङठख) मधून एमबीएची पदवी घेतली. लीना एमबीएमध्ये गोल्ड मेडलिस्ट होत्या. त्यांनी 1992 मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली.
तिथे 2016 मध्ये त्या मुख्य मानव संसाधन अधिकारी झाल्या. लीना नायर यांचा गेल्या महिन्यात फॉर्च्यून इंडियाने सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश केला होता. लीना नायर यांनी युनिलिव्हरमध्ये तब्बल 30 वर्षांची सेवा दिली.