मुंबई -ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. देशात संविधानाचे खच्चीकरण केले जात असल्याने आम्ही संविधान वाचवा ही चळवळ सुरु केल्याचे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी रविवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’वर देखील निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र अस्थिर आहे, याला दिल्लीचे लोक जबाबदार आहेत. आपल्या देशात संविधान वाचवण्याची नितांत गरज आहे. संविधानाचे निर्माते या महाराष्ट्राचे आहेत आणि महाराष्ट्रातच संविधानाची सर्वाधिक पायमल्ली सुरु आहे. कायद्याचं राज्य मोडून काढलं जातं आहे. देशभरात ज्या अनेक गोष्टी घटनेच्या आधाराने निर्माण केल्या त्याची पायमल्ली केली जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अस्थिर होण्यास दिल्लीचे आणि महाराष्ट्रातील काही लोक जबाबदार आहे. ”
“देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना संविधानावर अजिबात प्रेम नाही. संविधानापेक्षा पंतप्रधानांचं मन की बातवर जास्त प्रेम आहे. जर संविधानावर प्रेम असतं तर पंतप्रधानांवर मला लोक शिव्या देतात असं सांगत 91 शिव्यांची यादी वाचून दाखवण्याची वेळ पंतप्रधान मोदींवर आली आहे. लाल बहाद्दूर शास्त्री, पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी या सगळ्यांना शिव्या दिल्या गेल्या. मात्र त्यांनी कुणीही त्याचा वापर मतं मिळवण्यासाठी केला नाही. आपले पंतप्रधान प्रचारसभेत शिव्या वाचून दाखवत आहे. देशाने पहिल्यांदा रडणारा पंतप्रधान पाहिला आहे,” असा टोलाही यावेळी राऊतांनी मोदींना लगावला.
वज्रमूठ सभा संविधान रक्षण आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी
“आम्ही महाराष्ट्र दिनानिमित्त वज्रमूठ सभा आयोजित केली आहे. ही सभा फक्त संविधान रक्षण आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आहे. या देशात ज्याप्रकारे संविधानाचं खच्चीकरण सुरू आहे ते पाहता संविधान वाचवा ही चळवळ देशभर सुरू केली आहे. जिथे भाजपची सत्ता नाही तिथे कायद्याचं राज्य मोडून काढलं जात आहे. घटनेने निर्माण केलेल्या संस्थांची पायमल्ली सुरू आहे. एकाच राजकीय पक्षाचा मालकी हक्क सांगत आहे, ” असे संजय राऊत म्हणाले.