नवी दिल्ली – अक्षय कुमार स्टारर ओह माय गॉड 2 हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भगवान शिव कचोरी खरेदी करताना दाखवले आहेत. श्री महाकालेश्वर मंदिराचे पुजारी आणि अखिल भारतीय पुजारी महासंघाचे पंडित महेश शर्मा यांनी या चित्रपटात भगवान शंकराचे अशा प्रकारे सादरीकरण करण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. या प्रकरणी चित्रपटाचा निर्माता, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष आणि चित्रपट अभिनेत्याला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांच्या जनसुनावणीत पोहोचल्यानंतर हा चित्रपट उज्जैनमध्ये प्रदर्शित करण्यास विरोध नोंदवण्यात आला आहे.
या चित्रपटाबाबत कायदेशीर नोटीस बजावणारे श्री महाकालेश्वर मंदिराचे पुजारी पंडित महेश शर्मा म्हणाले की, तीर्थ क्षेत्रांवर चित्रपट बनवणे ही चांगली गोष्ट आहे. पण चित्रपटात देवाला कोणत्याही रूपात सादर करणे चांगले नाही. या प्रकारच्या सादरीकरणामुळे धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या श्रद्धा दुखावू शकतात, हे चित्रपट निर्मात्यांनी लक्षात ठेवावे. चित्रपटात भगवान शिव कचोरी विकत घेताना दाखवण्यात आले असून यामुळे आमच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. आम्ही उच्च न्यायालयाचे वकील अभिलाष व्यास यांच्यामार्फत चित्रपट दिग्दर्शक अमित राय, निर्माता विपुल शाह, चंद्रप्रकाश द्विवेदी, अभिनेता अक्षय कुमार तसेच सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
जाहीर माफीने वाद संपेल
पंडित महेश शर्मा म्हणाले की, या चित्रपटाबाबत आमचा कोणताही वाद नाही. मनोरंजनासाठी बनवल्या जाणाऱ्या या चित्रपटात आपल्या आवडत्या भगवान शिवाची मस्करी केली जाऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. चित्रपट निर्मात्याने महाकाल मंदिरात चित्रित केलेली दृश्ये चित्रपटातून काढून टाकावीत आणि चोवीस तासांत आमची जाहीर माफी मागावी.
मंगळवारी सकाळी पंडित महेश शर्माही उज्जैन जिल्ह्यात चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, अशी मागणी घेऊन जनसुनावणीला पोहोचले. हा चित्रपट उज्जैन जिल्ह्यात प्रदर्शित करू नये, अशी मागणी करणारा अर्ज त्यांनी दिला आहे.
या दृश्यावर आहे आक्षेप
ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एका कचोरीवाल्याकडून कचोरी खाण्यासाठी घेतो आणि त्याला आशीर्वाद देतो. त्यावेळी कचोरीवाला शिव शंकर वेशात असलेल्या अक्षय कुमारला आशीर्वाद नको पैसे द्या असं म्हणताना दिसतो.