हैदराबाद – सत्तारूढ कॉंग्रेसचे आमदार गद्दाम प्रसादकुमार यांची तेलंगणा विधानसभेच्या सभापतिपदी एकमताने निवड झाली. भाजप वगळता इतर पक्षांनीही प्रसादकुमार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यांच्या विरोधात इतर कुणी सभापतिपदाची निवडणूक लढवली नाही. तेलंगणात नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारल्याने त्या राज्यात सत्ताबदल झाला.
सत्ता गमावलेल्या भारत राष्ट्र समितीसह एमआयएम आणि भाकप या पक्षांनीही प्रसादकुमार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. सभापतिपदी निवड जाहीर झाल्यानंतर त्यांनी पदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी प्रसादकुमार यांच्याकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्याआधी भाजप आमदारांनी हंगामी सभापती अकबरूद्दीन ओवैसी यांच्याकडून शपथ घेण्यास नकार दर्शवला होता.