नवी दिल्ली – लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी दोन हात करताना शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून शौर्यपदक विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी ही घोषणा करण्यात आली.
लडाखमध्ये असणाऱ्या पॅंगॉंग सरोवराच्या परिसरात काही महिन्यांपासून भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 15 जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यावेळी चिनी सैनिकांनी लोखंडी रॉड आणि काटेरी तारा लावल्या बांबुंच्या साहाय्याने भारतीय सैनिकांवर अचानकपणे हल्ला चढवला होता. मात्र, कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वाखालील बिहार रेजिमेंटच्या जवानांनी डगमगून न जाता चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. मात्र, या लढाईत कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे 20 जवान शहीद झाले होते.