आधारस्तंभ : बीसीसीआयकडून वाढदिवसानिमित्त पुजाराचा सन्मान

मुंबई – भारतीय संघाचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजारा याचा सोमवारी वाढदिवस साजरा झाला. ब्रिस्बेन कसोटीसह या संपूर्ण कसोटी मालिकेत अत्यंत जबाबदारीने फलंदाजी केलेल्या पुजाराला भारतीय संघाचा आधारस्तंभ असा उल्लेख करत बीसीसीआयने त्याचा खास सन्मान केला आहे.

पुजाराने याबाबत आभार मानले असून येत्या काळात संघाच्या प्रत्येक यशात मोलाचा वाटा उचलण्यासाठी कटिबद्ध राहिन, अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्‍त केल्या आहेत.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला. 1-1 अशा बरोबरीत असलेल्या कसोटी मालिकेत चौथा सामना भारताने जिंकला व यजमानांना त्यांच्याचदेशात पराभूत केले. या सामन्यात अनेक खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण संपूर्ण मालिकेत भारतासाठी भिंत बनून उभा राहिलेल्या पुजाराचे बीसीसीआयने कौतुक केले आहे. ब्रिस्बेन कसोटीत त्याने चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा मारा शरीरावर झेलत 200 हून अधिक चेंडू खेळले. त्याच्या चिवट खेळीपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा माराही निष्प्रभ ठरला.

सोमवारी पुजाराने 34 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त बीसीसीआयने पुजाराला आधारस्तंभ असा उल्लेख करत त्याचा सन्मान केला. हा खेळाडू शरीरावर वेगवान चेंडूंचा मारा सहन करतो, तरीदेखील खेळपट्टीवर खंबीरपणे तळ ठोकून उभा राहतो. हा खरा धाडसी खेळाडू आहे. 81 कसोटी सामने, 6 हजार 111 धावा, 13 हजार 572 चेंडू आणि 18 शतके फटकावणाऱ्या भारतीय संघाचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजारा याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!, असे ट्‌विट बीसीसीआयने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.