पिंपरी – महापालिका आणि पोलीस प्रशासनाने गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी केली आहे. पर्यावरणपूरक विसर्जनासह सामाजिक सलोखा जपण्यावर देखील पोलिसांनी भर दिला असल्याचे पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर यांनी सांगितले. दैनिक प्रभातच्या पिंपरी चिंचवड विभागीय कार्यालयात गणेशोत्सव साजरा झाला. यात उप आयुक्त मंचक इप्पर यांच्या हस्ते श्रींची आरती झाली. त्यानंतर त्यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला. पिंपरी-चंचवड पोलिसांनी यावर्षी गणेशोत्सवात सामाजिक एकता वाढविण्यावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन करत पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर म्हणाले, गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी पोलीस विविध संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करीत आहेत. कृत्रिम हौदात विसर्जन तसेच मूर्तिदान आणि निर्माल्यदान करण्यासाठी नागरिकांना सांगितले जात आहे. या आवाहनाला नागरिक देखील चांगला प्रतिसाद देत आहेत. सर्व समाज बांधव गणेशोत्सवात यात सहभाग घेतात.
दरवर्षी डीजे तसेच इतर तत्सम वाद्यांचे आवाज यावरून वाद होतात. त्याच्या तक्रारी पोलिसांकडे येतात. पण यावर्षी अशा तक्रारी आलेल्या नाहीत. नियमांचे पालन करून विसर्जन करण्यावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भर देत आहेत. विसर्जन मिरवणुकांदरम्यान वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन एकमेकांचे स्वागत करतील, अशी परिस्थिती पोलिसांकडून निर्माण केली जात आहे. यामुळे समाजात चांगला संदेश जाईल, असा विश्वास देखील पोलीस उप आयुक्त इप्पर यांनी व्यक्त केला.