PMC Recruitment Scam: खेडेकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला! महापालिकेतील बनावट नोकरभरती गैरव्यवहार प्रकरण
PMC Recruitment Scam: बनावट ओळखपत्रे, सेवा पुस्तिका आणि खात्यात पगार दाखवून केला गंडा; जेजुरी मार्तंड देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक होण्याची शक्यता.

PMC Recruitment Scam – पुणे महापालिकेत विविध पदांवर नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी राजेंद्र बबनराव खेडेकर याचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला. या कथित भरती गैरव्यवहार प्रकरणात सहभागी आरोपींनी चौदाहून अधिक व्यक्तींना बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्याकडून जवळपास पावणेतीन कोटींहून अधिक रक्कम लाटल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या आरोपांवरून नोकर भरतीचा सुनियोजित घोटाळा उघडकीस येत असून, पुणे महापालिकेत नोकरीचे खोटे आश्वासन देऊन बेरोजगार तरुणांकडून मोठी रक्कम लाटण्यात आली आहे. हा गुन्हा मोठ्या संघटित कटाचा भाग असून, त्यामुळे सरकारी भरती प्रक्रियेवरचा सर्वसामान्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे, तसेच अनेक बेरोजगार व्यक्तींचे आर्थिक नुकसान झाले आहे. (PMC Recruitment Scam)
आरोपांचे स्वरूप व गांभीर्य, आरोपींचा प्राथमिक सहभाग व भूमिका, तपासाची सद्यःस्थिती आणि व्याप्ती व आरोपीच्या पोलीस कोठडीतील चौकशीची आवश्यकता लक्षात घेता त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने हा आदेश दिला. याप्रकरणी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र खेडेकर याच्याविरोधात भारती विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. (PMC Recruitment Scam)
हे भरती गैरव्यवहार प्रकरण मार्च २०२२ पासून सुरू असून, आरोपींनी बेरोजगारांना पालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यांनी आपसांत संगनमत करून महापालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून बोगस नियुक्तीपत्रे तयार केली. त्यांनी उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे, सेवा पुस्तिका,
वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि पगाराच्या पावत्याही दिल्या. इतकेच नव्हे तर उमेदवारांचा विश्वास बसावा, यासाठी त्यांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याचे दाखविले, असे तक्रारींमध्ये नमूद आहे. याप्रकरणी खेडेकरने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाला सरकारी वकील चंद्रकिरण साळवी आणि वामन कोळी यांनी विरोध केला.





