One Sided Love Murder: शालेय जीवनातील प्रेम जीवावर बेतले! हिंजवडीत तरुणाचा लोखंडी रॉडने निर्घृण खून, आरोपीला बेड्या
One Sided Love Murder: शालेय जीवनापासूनचे प्रेम आणि पुण्यात बीसीए करताना प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी जुळलेले सूत; संतापाच्या भरात आरोपीने केला खून.
One Sided Love Murder – हिंजवडी परिसरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणाचा लोखंडी रॉडने निर्घृण खून करून तरुणीला गंभीर जखमी करून पळून जाणाऱ्या आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी नाकाबंदी लावून बेड्या ठोकल्या आहेत. शालेय जीवनातील प्रेमातून आणि प्रेयसीच्या दुसऱ्या मुलासोबतच्या संबंधांच्या रागातून हा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्हा केल्यानंतर आरोपी पुणे-सोलापूर महामार्गाने कारमधून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात पळून जाणाऱ्या तयारीत असताना उरुळी कांचन पोलिसांनी ही कारवाई केली. दिनेश महादेव झांबरे (वय 23, मूळ रा. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर; सध्या रा. मारुंजी, भूमकर चौक, हिंजवडी, पुणे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नराधमाचे नाव आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश झांबरे आणि पीडित तरुणी यांचे शाळेत असतानापासून प्रेमसंबंध होते. दोघेही बीसीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते. पुण्यात शिक्षण घेत असताना तरुणीचे दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून, आरोपी दिनेश झांबरे हा हिंजवडी येथील तरुणी आणि तिचा मित्र राहत असलेल्या ठिकाणी लोखंडी रॉड घेऊन पोहोचला.
यावेळी त्याने दोघांच्याही डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली. घटनेनंतर आरोपी दिनेश झांबरे याने त्याच्या कारमधून पुणे-सोलापूर महामार्गाने पंढरपूरच्या दिशेने पळ काढला. घटना उघडकीस येताच हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी तातडीने उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याशी संपर्क साधून संशयित कार आणि आरोपीची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांच्या पथकाने तात्काळ उरुळी कांचन पोलीस ठाण्यासमोर सोलापूर महामार्गावर नाकाबंदी लावली. दरम्यान, काही वेळातच भरधाव वेगात आलेली अर्टिगा कार अडवली. कारचालक दिनेश झांबरे याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने हिंजवडीतील खुनाची आणि प्राणघातक हल्ल्याची कबुली दिली. आरोपीचा पाठलाग करीत हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधावने, नरेश बलसाने यासह पथक उरुळी कांचन येथे पोहोचले. उरुळी कांचन पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपी दिनेश झांबरे आणि गुन्ह्यात वापरलेली अर्टिगा कार पुढील तपासासाठी हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन केली आहे.
ही कामगिरी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सोमनाथ चितारे, सचिन जगातप, कमलेश होले, सचिन मोरे, उध्दव गायकवाड, प्रशांत पवार, निलेश जाधव, विकास लगस, पोलीस हवालदार, ऋषीकेश रासकर, अश्वजित मोहोड, सुवर्णा गायकवाड यांनी केली.






