Mulshi Crime: मुळशी तालुका हादरला! मुलखेडमध्ये ३० तोळे सोन्यासह लाखो रुपयांचा ऐवज लंपास
Mulshi Crime: गेल्या दोन महिन्यांत मुलखेडमध्ये दुसरी गंभीर घटना; पोलिसांकडून तातडीने दरोडेखोरांचा शोध घेण्याची ग्रामस्थांची मागणी.

Mulshi Crime – मुलखेड (ता. मुळशी) येथे बुधवारी (दि. ५) पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी दोन घरे लक्ष्य करत चोरी केली. एका घरातून तब्बल ३० तोळे सोने, ३० तोळे चांदी आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. तर दुसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न उधळणाऱ्या घरमालकावर दरोडेखोरांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. या लागोपाठ झालेल्या घटनांमुळे मुलखेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना रणजीत भगवान केदारी यांच्या घरी घडली. दरोडेखोरांनी केदारी यांच्या घराच्या मागील बाजूची खिडकी फोडून आत प्रवेश केला. घरातील सर्व सदस्य झोपेत असताना चोरट्यांनी ३० तोळे सोने, ३० तोळे चांदी आणि १५ हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला. सकाळी कुटुंबीय उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर दरोडेखोरांनी अनिल भालेराव यांच्या घराचे कुलूप/दार तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच जाग आल्याने भालेराव यांनी दरोडेखोरांना रोखण्याचा धाडसी प्रयत्न केला. या वेळी दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. भालेराव यांच्या आरडाओरड्यानंतर शेजारी मदतीला धावून आल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.
जखमी अनिल भालेराव यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांत गावात घडलेली ही दुसरी गंभीर चोरीची घटना असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी या दरोडेखोरांचा तातडीने शोध घेऊन मुसक्या आवळाव्यात आणि गावात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी मुलखेडच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.




