PMC News – आधी महापौर, आज स्थायी समिती अध्यक्ष आणि आता महापालिकेच्या विषय समित्यांची निवडणूकही बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा विषय समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी आज (ता. २३) अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान फक्त भाजपच्या उमेदवारांचेच अर्ज दाखल झाल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महापालिकेत भाजपनंतर सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीकडे उमेदवारी अर्ज दाखल करायचा झाल्यास या समित्यांमध्ये केवळ दोनच सदस्य असल्याने त्यांना अर्जच दाखल करता आले नसल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. महापालिकेत स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्य्यानंतर विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती आणि नाव समिती या सहा समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. अर्ज भरण्याची वेळ दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशी होती. या कालावधीत भाजपतर्फे सर्व पदांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. विधी समितीच्या अध्यक्षपदासाठी स्वरदा बापट आणि उपाध्यक्षपदासाठी पायल तुपे, शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदासाठी स्मिता वस्ते व उपाध्यक्षपदासाठी सपना छाजेड, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी अल्पना वरपे व उपाध्यक्षपदासाठी तन्वी दिवेकर, क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी नारायण गलांडे व उपाध्यक्षपदासाठी दिनेश माथवड, शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी अरुण राजवाडे व उपाध्यक्षपदासाठी अतुल तरवडे, तर नाव समितीच्या अध्यक्षपदासाठी पल्लवी जावळे आणि उपाध्यक्षपदासाठी सुनील पांडे यांनी भाजपकडून अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीची अडचण महापालिकेच्या विषय समितीत एकूण १३ सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य आहे. या समित्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरायचा झाल्यास एक उमेदवार, एक सूचक आणि एक अनुमोदकाची स्वाक्षरी आवश्यक असते. मात्र, राष्ट्रवादीचे दोनच सदस्य असल्याने अर्ज भरणेच शक्य नव्हते. परिणामी उमेदवारासाठी सूचक मिळाला, तरी अनुमोदक मिळणे शक्य नव्हते किंवा सूचक-अनुमोदक तयार केले, तरी उमेदवार कोणाला करायचा, हा प्रश्न निर्माण झाला. या पेचामुळे राष्ट्रवादीला अर्जच भरता आला नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले असते, तर किमान प्रत्येकी एक उमेदवार देता आला असता. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये त्याबाबतही चर्चा झालेली नाही.