Narhari Zirwal : लाचखोरी प्रकरणामुळे राजकारण तापलं! राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी; सुनेत्रा पवारांनी बोलावली तातडीची बैठक
Narhari Zirwal : मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोर प्रकरणाने राजकारण तापले असून, या प्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीची बैठक बोलवली आहे.
Narhari Zirwal : अन्न व औषध प्रशासन खात्याच्या मंत्रालयातील कार्यालयात चक्क लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पडकले. यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. एसीबीने अटक केलेल्या लिपिकाचे नाव राजेंद्र ढेरंग असून, त्याची चौकशी एसीबीकडून केली जात आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा डागळल्याची चर्चा होत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी तातडीची बैठक बोलवली आहे.
लाचखोरीच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्ष केले जात आहे. प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, याबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. सायंकाळी सहा वाजता ही बैठक बोलावल्याची माहिती आहे.
या बैठकीत या प्रकरणाची सत्यता तसेच हे संपूर्ण प्रकरण समजून घेतले जाणार आहे. या प्रकरणात काय भूमिका घ्यायची यावर देखील चर्चा होणार आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपिकानेच लाच स्विकारल्याच्या प्रकाराने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. आरोपांच्या फैरी झडल्या असून, राजकारण चांगलेच तापले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले होते. आलोसे राजेंद्र ढेरंग यांनी एका औषध दुकानदाराचा निलंबित परवाना पुन्हा देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. यापैकी ३५ हजार रुपये स्विकारताना राजेंद्र ढेरंग एसीबीच्या जाळ्यात सापडले.
चौकशीचे आदेश
या लाचखोरीच्या प्रकरणामुळे नरहरी झिरवळ यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवळ यांनी विभागातील दक्षता पथकाला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
नरहरी झिरवाळ काय म्हणाले?
लाचखोरीच्या प्रकरणात लिपिकाला एसीबीने ताब्यात घेतल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणावर झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली होती. “जर या भ्रष्टाचाराचे धागेदोरे माझ्यापर्यंत येत असल्याचे सिद्ध झाले, तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे. या प्रकरणाशी माझा थेट संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन,” असे म्हटले होते.
हेही वाचा : Tarique Rahman: तारिक रहमान १७ फेब्रुवारीला घेणार पंतप्रधानपदाची शपथ ; पंतप्रधान मोदींना येणार निमंत्रण ?






