pune: स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले बिनविरोध
pune

pune: महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भिमाले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सुहास टिंगरे यांचा अर्ज दाखल केला होता. मात्र, टिंगरे यांचा अर्ज एक मिनिट उशिराने दाखल करण्यात आला होता.
निवडणूक सुरू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांनी छाननीच्या वेळी टिंगरे यांचा अर्ज विहित मुदतीनंतर आल्याने ते अवैध ठरवले. त्यामुळे भिमाले यांचा एकच अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे , नगरसचिव योगिता भोसले यांच्यासह स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. १६ सदस्य असलेल्या स्थायी समितीत भाजपचे १२ सदस्य आहेत. तर ३ सदस्य राष्ट्रवादीचे असून १ सदस्य काँग्रेसचा आहे.
भिमाले यांनी महापालिकेत २०१७ मध्ये सभागृहनेते पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तर राष्ट्रवादीचे सदस्य अमोल बालवडकर हे या सभेसाठी अनुपस्थित होते.
वैशाली बनकर यांनी घेतला आक्षेप
टिंगरे यांचा अर्ज अवैध ठरविल्यानंतर वैशाली बनकर यांनी आक्षेप घेतला. आम्ही एक वाजता पोहचलो होतो. घेण्यास एक मिनिट उशीर झाला आहे असे सांगितले. त्यावर स्थायी सदस्य विशाल धनावडे यांनी आक्षेप घेतला.
यावेळी नगरसचिव योगिता भोसले यांनी कार्यालयात सीसीटीव्ही आहेत त्यात वेळ आहे. त्यामुळे अर्ज उशीरा आल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. तर प्रशांत जगताप यांनी अर्ज भरण्यास वेळेवर आल्यावर त्यांची नोंद होते. त्यामुळे नंतर आलेला अर्ज स्वीकारावा अशी मागणी केली.
मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही टिंगरे यांना माघार घेण्यासाठी वेळ दिला. मात्र, माघार न घेता राष्ट्रवादीचे दोन्ही सदस्य सभागृहातून निघून गेले. त्यानंतर भिमाले यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.





