PMC Hospitals: महापालिकेच्या रुग्णालयांत बालरोगतज्ज्ञांचा तुटवडा! १३ पैकी तब्बल ८ पदे रिक्त; उपचारांवर वाढता ताण
PMC Hospitals: येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयाच्या पत्रांनंतरही स्वतंत्र विभाग मिळेना; गरिबांच्या मुलांना उपचारासाठी इतरत्र जाण्याची वेळ.

PMC Hospitals – पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील बालरोगतज्ज्ञांच्या रिक्त पदांमुळे नवजात आणि बालरुग्णांच्या उपचार सेवांवर ताण वाढत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांसाठी मंजूर असलेल्या १३ बालरोगतज्ज्ञ पदांपैकी केवळ पाच पदे भरलेली आहेत. तर तब्बल आठ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कमला नेहरू रुग्णालय, सोनावणे रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभाग चालविताना प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नवजात शिशूंना जन्मानंतर विशेष उपचारांची आवश्यकता असते. अकाली जन्म, कमी वजन, श्वसनाचा त्रास, संसर्ग अशा गंभीर परिस्थितींमध्ये एन आयसीयूमधील बालरोगतज्ज्ञांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, उपलब्ध डॉक्टरांवर अनेक रुग्णालयांची जबाबदारी असल्याने कामाचा ताण वाढत आहे. उपचार व्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात या पूर्वीही विविध विशेषज्ञ डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. महापालिकेच्या रुग्णालयांवरील वाढता रुग्णभार लक्षात घेता विशेषज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढविण्याची गरज आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, बालरोगतज्ज्ञांची रिक्त पदे तातडीने भरली नाहीत, तर विशेषतः पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांच्या काळात बालरुग्णांच्या उपचारांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने नियमित भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करून आवश्यक त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
राजीव गांधी रुग्णालयात उपचाराची गैरसोय
येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात बालरोग विभागासाठी स्वतंत्र जागा व तज्ज्ञ देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. रुग्णालयाचे प्रमुख यांनी वारंवार संबंधित विभागाला पत्र पाठविले आहे. मात्र, अद्याप स्वतंत्र विभाग सुरू झालेला नाही. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या लहान मुलांना इतर रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे.





