PMC Negligence: पुणेकरांनो पुन्हा पुराचा धोका? महापालिकेच्या भयंकर निष्काळजीपणाचा धक्कादायक खुलासा
PMC Negligence: जुलै २०२४ मधील एकतानगरीतील पूरपरिस्थितीनंतरही धडा नाही; धरणात ७०% पाणीसाठा होऊनही पालिकेची २४ तास कर्मचारी नियुक्तीस दिरंगाई.

PMC Negligence – खडकवासला धरणातून नदीपात्रात पाणी सोडताना महापालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वय राहावा, यासाठी सिंचन भवन येथील मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षात २४ तास पालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पाटबंधारे विभागाने १५ दिवसांपूर्वी पत्र देऊनही महापालिकेने अद्याप येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा समन्वयाअभावी शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जुलै २०२४ मध्ये खडकवासला धरणातून सुमारे २० हजार क्युसेकने अचानक पाण्याचा विसर्ग केला होता. मात्र, पूर्वसूचनेअभावी सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीसह विविध परिसरातील शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. या घटनेनंतर जलसंपदा विभागाने पालिकेला माहिती दिल्याचा दावा केला होता, तर महापालिकेने पूर्वसूचना मिळालीच नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली होती. दोन्ही यंत्रणांमधील या असमन्वयाचा फटका पुणेकरांना बसला होता.
या पार्श्वभूमीवर असा प्रकार टाळण्यासाठी पूर नियंत्रण कक्षात तीन सत्रांमध्ये (शिफ्ट) पालिकेच्या कनिष्ठ अभियंता दर्जाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे ठरले होते. यंदा धरणे ७० टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाटबंधारे विभागाने १५ दिवसांपूर्वीच महापालिकेला पत्र पाठवून २४ तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. मात्र, पालिकेने अजूनही एकाही कर्मचाऱ्याची नियुक्ती न केल्याने पालिका प्रशासन सुस्तच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
जलद निर्णय प्रक्रियेची गरज
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागतो. अशा वेळी आपत्कालीन यंत्रणांमध्ये थेट संपर्क असणे अत्यंत आवश्यक असते. विसर्ग करण्याआधी त्याची पूर्वकल्पना विविध विभागांना देणे आवश्यक असते. पालिकेने पूर नियंत्रण कक्षात कर्मचारी नियुक्त केल्यास पाण्याचा विसर्ग वाढताच त्याची माहिती तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नागरिकांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.






