Pune News : येरवडा खुले कारागृह झाले विठ्ठलमय! ‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषात ‘आषाढी वारी विशेष कीर्तन महोत्सव’ संपन्न!
"टाळ वाजे, मृदंग वाजे, विठ्ठलाचे नाव गाजे... भक्तीच्या या रंगात आज, येरवडा खुले कारागृह साजे!" या चैतन्यमय आणि भक्तीमय घोषात आज येरवडा खुले कारागृह पूर्णपणे विठ्ठलमय झाले होते.

Pune News : महाराष्ट्र कारागृह विभागाच्या “सुधारणा आणि पुनर्वसन” धोरणांतर्गत मा. डॉ. सुहास वारके (भा.पो.से.) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच सुनील ढमाळ, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आज सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४:३० ते ६:०० या वेळेत ”आषाढी वारी विशेष कीर्तन महोत्सवाचे” अत्यंत भव्य आणि भावुक वातावरणात आयोजन करण्यात आले.
“टाळ वाजे, मृदंग वाजे, विठ्ठलाचे नाव गाजे… भक्तीच्या या रंगात आज, येरवडा खुले कारागृह साजे!” या चैतन्यमय आणि भक्तीमय घोषात आज येरवडा खुले कारागृह पूर्णपणे विठ्ठलमय झाले होते. कायद्याच्या मर्यादांमुळे पंढरीच्या वाटेवर चालता येत नसले तरी, थेट विठू माऊलीची वारीच आज कारागृहाच्या प्रांगणात अवतरली होती.
आळंदी येथील “जगतसद्गुरु श्रीतुकाराम महाराज वारकरी संस्था” (तळनगर, आंबेगाव बुद्रुक) चे अध्यक्ष व प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. लहू महाराज जाधव यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून आषाढी एकादशीच्या विशेष अभंगांचे प्रवचन व किर्तन केले. विठ्ठल भक्तीचा महिमा सांगत त्यांनी संपुर्ण कारागृहाला अद्भूत आध्यात्मिक ऊर्जेने भरून दिले.
या किर्तन सोहळ्याला संगीत क्षेत्रातील दिग्गज प्रसिद्ध तबलावादक श्री. पांडुरंग विठ्ठल पवार, हार्मोनियम वादक श्री. अभय नलगे, गायनचार्य श्री. सदानंद महाराज कडूळे, मृदंग व तबलासाथ चैतन्य पांडुरंग पवार आणि सूर्यांश समाधान शर्मा या कलाकारांची उत्कृष्ट साथ लाभली.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थित असलेले संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व लेखक श्री. विजय बोत्रे पाटील यांनी येरवडा कारागृहाच्या इतिहासातील एका अद्वितीय आणि ऐतिहासिक संदर्भाला उजाळा दिला. महात्मा गांधी जेव्हा येरवडा कारागृहात बंदिस्त होते, तेव्हा त्यांनी संत जगतसद्गुरु तुकाराम महाराजांच्या १४ प्रसिद्ध अभंगांचे इंग्रजी भाषेत भाषांतर केले होते, ही आठवण त्यांनी करून दिली. हि भूमी केवळ शिक्षेची नसून वैचारिक परिवर्तनाची आणि आध्यात्मिक साधनेची आहे, हेच गांधीजींच्या या कृतीतून सिद्ध होते, असे बोत्रे पाटील यांनी सांगितले.
या सोहळ्यात बंदीवानांशी अत्यंत संवेदनशील संवाद साधताना येरवडा खुल्या कारागृहाचे अधीक्षक श्री. शामकांत शेडगे यांनी तुकोबांच्या प्रसिद्ध अभंगाचा दाखला देत ते म्हणाले,
“पापाची वासना नको दावू डोळां । त्याहुनि आंधळा बराच मी ॥१॥
निंदेचे श्रवण नको माझे कानीं ।बधीर करोनी ठेवी देवा ॥२॥
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।त्याहूनि मुका बराच मी ॥३॥
यातून संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. कारागृहातील हा काळ आत्मपरीक्षणाचा आणि स्वतःला बदलण्याचा आहे. बंदीवानांनी आपल्यातील वाईट प्रवृत्तींचा कायमचा त्याग करून संतांनी दाखवलेल्या सत्कर्माच्या मार्गावर चालावे, हेच या कीर्तन महोत्सवाचे खरे फलित असेल.” त्यांच्या या विचारांनी उपस्थित बंदीवानांचे डोळे पाणावले.
या सोहळ्याचा प्रारंभ विठू माऊली आणि संत ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलाने झाला. सर्व उपस्थितांनी डोळे बंद करून, हात जोडून विश्वाचे कल्याण मागणाऱ्या “पसायदानाचा” सामूहिक उच्चार केला. पसायदानाच्या पवित्र स्वरांनी आणि “राम कृष्ण हरी” च्या भक्तीमय जयघोषाने या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कीर्तन महोत्सवाची सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी नागेश कांबळे, तुरुंग अधिकारी नागनाथ भानवसे, श्रीमती निशा श्रेयकर, कार्यालयीन अधीक्षक नीता उके, वरिष्ठ लिपिक गोविंद गावडे, लिपिक प्रवीण खुस्पे, सुभेदार सुनिल गायकवाड, बालाजी सांवत, चंद्रकांत खांदवे, हवालदार राजेंद्र धनगर, दत्तात्रक मोडक, कारागृह महिला शिपाई सरला साबळे, मिना पोटकुले, संध्या जाधवर, ऐश्वर्या मुळे, संतोषी हिंगे कारागृह शिपाई राकेश पवार, याकुब शेख, विजयकुमार दिवेकर, निलेश मांढरे, महेंद्र लोहकरे इत्यादींना मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी कारागृहातील सर्व शिक्षाबंदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






