PMPML: महापालिकेच्या ३२ जागांवर पीएमपीचा दावा! आयुक्त नवल किशोर राम तयार करणार अहवाल
PMPML: पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांची महापालिकेच्या खास सभेत २४ आरक्षित जागा तातडीने देण्याची मागणी.

PMPML – पीएमपीच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महापालिकेच्या विकास आराखड्यात राखीव असलेल्या ३२ जागा म्हणजे सुमारे ९० एकर क्षेत्र असलेल्या जागांमधील पीएमपीला २४ जागा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी महापालिकेच्या खास सभेत केली. त्यानंतर या, जागांची सद्यःस्थिती आणि त्या कशा पद्धतीने ताब्यात घेणे शक्य आहे की नाही याचा अहवाल पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुढील ३० दिवसांत तयार करणार आहेत.
पीएमपीच्या खास सभेत व्यवस्थापकीय संचालक आव्हाड यांनी सादरीकरण केल्यानंतर माजी सभागृह नेते धीरज घाटे यांनी पीएमपीसाठी किती जागा विकास आराखड्यात राखीव आहेत आणि किती जागा मिळाल्या आहेत. तसेच, मिळालेल्या किती जागांचा वापर व्यावसायिक वापरासाठी करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी आव्हाड यांनी महापालिकेच्या विकास आराखड्यात सुमारे ३२ जागा आरक्षित असून,
त्याचे एकूण क्षेत्र ९० एकर जागा आहे. या जागांचा माहिती घेतली असून, त्यातील २४ जागा तातडीने हव्या असल्याचे सांगितले. तसेच, या जागा खासगी असून, त्या ताब्यात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून, या जागा महापालिकेने ताब्यात घेऊन पीएमपीला हस्तांतरित कराव्यात अथवा पीएमपीला पैसे दिल्यास पीएमपी त्या ताब्यात घेईल, असे सांगितले.
यावेळी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी असा कोणताही अधिकार पीएमपीला नाही. या जागा डीपीतील असल्याने त्या महापालिकेलाच ताब्यात घ्याव्या लागतील. तसेच, त्याची माहितीही प्रशासनाकडेच आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनीच याबाबत आरक्षित जागा आणि त्यांची सद्यःस्थिती याबाबतचा अहवाल ३० दिवसांत तयार करून याबाबत पीएमपीची संयुक्त बैठक घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.





