पिंपरी, (प्रतिनिधी) – वापरकर्त्याच्या गरजा समजून घेतल्याने या क्षेत्राची प्रगती होणार आहे. आर्मी डिझाईन ब्युरो व इतर लष्करी संस्था देखील योगदान देत आहेत. या निमित्ताने डिफेन्स इकोसिस्टिम तयार होत आहे.त्यामुळे आत्मनिर्भरतेला वाव मिळेल. स्वदेशीकरणाने सक्षमीकरण शक्य होणार आहे. उगवत्या भारताच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख मनोज पांडे यांनी केले.
मोशी येथील डिफेन्स एक्स्पो या शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या समारोपाच्या दिवशी (दि.26) लष्करप्रमुख मनोज पांडे व नौसेना प्रमुख अॅडमिरल आर.हरी कुमार यांनी भेट देत विविध स्टालची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, निबे लिमिटेडचे अध्यक्ष गणेश निबे, स्ट्रॅटेजिक पार्टनर कंपन्यांचे प्रतिनिधी अनिल कुलकर्णी,आदित्य वागळे,मयंक तिवारी,अजय शर्मा आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात नौसेना प्रमुख ऍडमिरल आर.हरी कुमार म्हणाले की, भविष्यात काय होईल हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे या संरक्षण क्षेत्रात जबाबदार्यांचा कस लागतो. त्यात सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. स्वदेशी आणि सर्वंकष शस्त्रात्रे, तंत्र हे उद्दिष्ट आहे. धोरणात्मक स्वायतत्ता मिळविण्यासाठी कार्य केले पाहिजे. प्रत्येक गोष्ट भारतात तयार होण्यासाठी काम केले पाहिजे. एक विकसित देश म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी योगदान दिले पाहिजे.
समारोपाच्यादिवशी (दि.26) सकाळी साडे आठ वाजता नेव्ही बँडचे सादरीकरण झाले. साडे नऊ ते पावणे दहा वाजता इंडियन नेव्हीविषयी सादरीकरण करण्यात आले . तर लष्करप्रमुख मनोज पांडे, लेफ्टनंट जनरल जे. बी. चौधरी यांनी विविध दालनांना भेटी दिल्या. साडेअकरा वाजता लेफ्टनंट जनरल सी.एस.मान यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
त्यानंतर कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, व्हाईस अॅडमिरल एस.व्ही. भोकरे, लेफ्टनंट जनरल अदोश कुमार, अनिल यादव, जसबीर सिंह सोळंकी, ब्रिगेडियर विकास, रवी सिन्हा, मनदीप सिंग, धनंजय सोनवणे, रमेश भाटिया, राहुल पांगरे यांनी मार्गदर्शन केले. साडेबारा वाजता आर्मी बँडचे, पावणेपाच वाजता एअरफोर्स बँडचे सादरीकरण झाले. सायंकाळी पाच वाजता या प्रदर्शनाच्या समारोपाचा कार्यक्रम पार पडला.
तीन लाख नागरिकांची प्रदर्शनाला भेट
सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाच्य शस्त्रसामग्री निर्मितीचे प्रतिबिंब असलेल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो -2024’ मध्ये तिसर्या दिवशी विद्यार्थी, नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.तीन दिवसात एकूणतीन लाखाहून अधिक विद्यार्थी, नागरिकांनी भेट देऊन लष्करी शस्त्र सामग्री आणि तंत्रज्ञान प्रणालींची माहिती करून घेतली. प्रदर्शनात तिन्ही भारतीय सैन्यदलाचे प्रमुख यांच्या भेटी आणि संवादामुळे विद्यार्थी आणि उपस्थित नागरिक भारावून गेले .