- पालिका कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून निषेध
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेली धन्वंतरी स्वास्थ योजना करोनाच्या संकटात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुंडाळली आहे. करोना कालावधीत कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. या काळात कर्मचाऱ्यांचा विरोध डावलून योजना बंद केल्याने कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून काम करत निषेध व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आणि सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांना काळ्या फिती बांधण्यात आल्या. महापालिका सेवेतील, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी स्वास्थ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यांपासून ही योजना बंद करुन त्याऐवजी विमा पॉलिसी आणण्याचे प्रयत्न झाले. त्याला महासंघाचा विरोध होता. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अचानक 14 सप्टेंबर 2020 पासून रात्री 12 नंतर ही योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. धन्वंतरी स्वास्थ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती. तथापि, प्रशासकीय कारणास्तव ही योजना 14 सप्टेंबर पासून स्थगित करण्यात येत आहे. सर्व पॅनेलवरील रुग्णांलयांनी याची नोंद घेवून 15 सप्टेंबरच्या पहाटे एकनंतर धन्वंतरी योजनेतील कोणत्याही सभासदांना या योजनेअंतर्गत उपचाराकरिता दाखल करून घेऊ नये, असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
आयुक्तांच्या या निर्णयाला कर्मचारी महासंघाने विरोध केला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत धन्वंतरी स्वास्थ ही वैद्यकीय योजना कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे. प्रशासनाने या महामारीत योजना बंद करणे अतिशय चुकीचे आहे. आयुक्तांनी हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महासंघाच्या सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे यांनी दिला आहे.