पारनेर – वाढीव पाणीपट्टी व घरपट्टीसंदर्भात आलेल्या नोटिसांची पारनेरकरांनी होळी करून असंतोष व्यक्त केला आहे. या संबंधीचे निवेदन ग्रामस्थांतर्फे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, नगरसेवक युवराज पठारे, नगरसेवक अशोक चेडे, माजी नगरसेवक विशाल शिंदे, भाऊ ठुबे, ऋषी गंधाडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पारनेर पंचायत हद्दीत दहा दिवसांच्या अंतराने शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच नगर पंचायत आराखड्यामध्ये खासगी आरक्षण टाकण्यात आलेले आहे. चालू वर्षाच्या नगर पंचायत हद्दीतील सदनिका व व्यावसायिक गाळ्यांच्या कराची वाढीव रक्कम आकारण्यात आलेली आहे. चालू वर्षीच्या नगर पंचायत हद्दीतील सदनिका व व्यावसायिक गाळ्यांच्या कराची रक्कम कमी करण्यात यावी. नगरपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा हा एक दिवसाच्या अंतराने पूर्ण दाबाने करण्यात यावा. विकास आराखड्यात खासगी जागावर टाकण्यात आलेले आरक्षण त्वरित रद्द करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
या मागण्यांची येत्या पंधरा दिवसांत पूर्तता न झाल्यास नगर पंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
नगरपंचायतमधील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवली. ग्रामस्थांना देण्यात आलेल्या वाढीव पाणीपट्टी व घरपट्टी संधर्भात नगर पंचायत प्रशासनाने लवकरात लवकर प्रश्न सोडविला नाही तर ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण शहर बंद ठेऊन निषेध व्यक्त केला जाईल, असे नगरसेवक युवराज पठारे यांनी सांगितले.
निवेदनावर चंद्रकांत चेडे, युवराज पठारे, ऋषी गंधाडे, भाऊ ठुबे, विशाल शिंदे, अशोक चेडे, ज्ञानेश्वर सातपुते, किरण कोकाटे, ज्ञानेश्वर औटी, सचिन पठारे, सुभाष औटी, अनिल गंधाडे, जाधव भाऊसाहेब, माऊली सातपुते, प्रकाश घोडके, अनिल भंडारी विलास कटारिया, शेशमल बोरा, सचिन गांधी, मंगेश कावरे, नितीन गांधी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.