पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेचा फज्जा,
रेडा – भूमीहीनासाठी हक्काची जागा व घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य योजना अंमलात आणली. परंतु 2016-2017, 2017-2018, 2018-2019 या तीन वर्षांच्या अनुदानाला जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय मंजुरी मिळुन सुद्धा केवळ ऑनलाइन अनुदान कसे सोडायचे, यांची माहीती पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना नसल्यामुळे सुटता सुटेना, ही गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना ना घर- ना घाट, अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
अर्थसहाय्य मार्गदर्शक सूचना आल्यावर तात्काळ अदा करू
जिल्हा परिषदेने पंडित दीनदयाळ योजनेअंर्गत जागा खरेदी लाभार्थ्यांना मंजुरी तात्काळ दिलेली होती. परंतु त्याचबरोबर लाभार्थ्यांचे ऑनलाइन अनुदान कसे वितरित करायचे नोंदणी कशी करायची, लाभार्थ्यांचे ऑनलाईन नावे कशी शोधायची, यांचे प्रशिक्षण मात्र, ऑपरेटरना देण्याचा विसर पडला आहे की काय, असा प्रश्न पडला आहे.
पंचायत समितीने प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषदेकडे मार्गदर्शक सूचना मागवल्या आहेत. परंतु अद्यापर्यंत तरी त्यांना मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे पंचायत समिती मात्र, जिल्हा परिषदेकडून मार्गदर्शन होत नसल्यामुळे आम्ही अनुदान कसे वितरित करायचे, असे सवाल लाभार्थ्यांना करीत आहे. ऑनलाइन प्रणाली आली आणि कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त कामे होऊ लागली आहे. परंतु त्याला पंडित दिनदयाळ उपाध्याय योजना अपवाद आहे, यात मात्र,काही शंका नाही.
उसने पैसे फेडायचे तरी कसे –
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी नातेवाईकांकडून हातउसने पैसे घेतले आहेत. परंतु माझे नाव मंजूर असून सुद्धा मला माझे पैसे मिळत नाहीत. घेतलेले पैसे नातेवाईकांना कोठून द्यायचे, असा प्रश्न मला पडला आहे, अशी कैफियत तरंगवाडी येथील लाभार्थी हिराबाई सोपान तरंगे यांनी मांडली.
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीचे ऑनलाइन अनुदान सोडताना अडचणी आवास सॉप्ट प्रणालीला लाभार्थ्यांचे मंजूर नावे दिसत नाहीत. काही लाभार्थ्यांचे बॅंकेचे खाते क्रमांक बरोबर आहेत. सॉप्टवेअरला चेक करा, असे मेसेज येत आहेत. या संदर्भात प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे मार्गदर्शन सूचना मागवल्या आहेत. त्या आल्या की लाभार्थ्यांचे पेमेंट वितरित केले जाईल. कोणत्याही लाभार्थ्यांचे पेमेंट इंदापूर पंचायत समितीकडे राहणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी चिंता करू नये, – विजयराव परीट, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, इंदापूर.