इस्लामाबाद – पाकिस्तानने आज जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या “गझनवी’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र 290 किलोमीटरपर्यंत एकापेक्षा अधिक स्फोटके वाहून घेऊ जाऊ शकते, असे पाकिस्तानच्या लष्कराच्यावतीने सांगण्यात आले. भारताबरोबरचे संबंध ताणलेले असतानाच पाकिस्तानने ही क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे.
पाकिस्तानचे लष्करी माध्यम प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी आज या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणासाठी रात्रीच्या प्रशिक्षणाचा एक व्हिडीओ शेअर केला. “जॉईन्ट चीफ ऑफ स्टाफ कमिटी’चे अध्यक्ष आणि तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांनी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल तज्ञांच्य पथकाचे अभिनंदन केले असल्याचेही गफूर यांनी सांगितले.
पकिस्तानने गुरुवारी कराचीवरील 3 हवाई मार्ग 31 ऑगस्टपर्यंत भारताच्या विमानासाठी बंद केले आहेत. यामुळेच पाकिस्तानकडून क्षेपणास्त्राची चाचणी घेतली जाण्याची शक्यता व्यक्त झाली होती.