नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आज त्यांचा 43 वा स्थापना दिवस साजरा करत आहेत. 1980 मध्ये आजच्याच दिवशी भाजपची स्थापना झाली होती. त्याच पार्श्वभुमीवर आज देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन भाजपकडून करण्यात आले आहे. देशातील वेगवेगळ्या कार्यालयात कार्यक्रम पार पडणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज स्थापना दिवसाच्या निमित्तानं दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण करणार आहेत. तर आज सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यासंदर्भात मोदींनी एक ट्वीटही केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “6 एप्रिल हा दिवस भाजपसाठी महत्त्वाचा आहे, कारण हा पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्तानं सकाळी 10 वाजता पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.”
Tomorrow, 6th April is an important day for @BJP4India as it is the Sthapana Diwas of the Party. At around 10 AM, will be addressing Party Karyakartas.
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2023
भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ यांनी याविषयी बोलताना,”आपल्या स्थापना दिनानिमित्त पक्षानं 6 एप्रिल 2023 ते 14 एप्रिल या कालावधीत डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष सप्ताह पाळण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील.” असे म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होते, जे 1977 मध्ये जनता पक्षात विलीन झाले. 1980 मध्ये जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना केली होती. स्थापनेनंतर भाजपचे पहिले लक्ष गुजरात, राजस्थान आणि संयुक्त मध्य प्रदेश याच राज्यांवर होते. केवळ तीन राज्यांपुरता मर्यादित असणारा पक्ष आज बघता बघता केवळ देशच नाहीतर संपूर्ण जगभरातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे. सध्या 12 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. लोकसभेत पक्षाच्या 303 जागा आहेत, तर राज्यसभेतही सुमारे 100 खासदार भाजपचे आहेत. कार्यकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे.