बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना
परीक्षेसाठी पर्याय निवडण्यासाठी संधी
पुणे – 19 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाची आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षाही घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून होतील. त्यातील एक पर्याय निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना 21 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
नियमित प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा पुढच्या महिन्यात होत आहे. ही परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईनद्वारे होणार आहे. नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेबरोबरच विद्यापीठाच्या बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील बॅकलॉग आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा दोन्ही पर्यायातून होणार आहेत. ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्हीतून एक पर्याय निवडण्याचे स्वांतत्र्य विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन माहिती भरण्यासाठी लिंक खुली केली आहे. त्यात विद्यार्थ्यांनी सर्व माहिती नमूद करावी, असे आवाहन विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.
बहि:स्थ अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लिंकवरून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षेचा पर्याय निवडताना अर्ज कसा सादर करावा, याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे, असेही प्रा. सोनवणे यांनी सांगितले.
अर्ज करताना काही अडचणी अथवा शंका आल्यास विभागाच्या 020-25622458/59 या क्रमांकावर संपर्क साधावा. अर्जासाठी लिंक : http://sps.unipune.ac.in/app/