नवी दिल्ली -भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर देशातील महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देशतील सर्वच क्रीडा संघटनांना नोटीस पाठवली असून त्यात बीसीसीआय व भारतीय क्रीडा प्राधिकरणाचाही (साई) समावेश आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरुद्ध महिला कुस्तीपटू जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. भारताच्या सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला असून त्यात एका अल्पवीयन महिला कुस्तीपटूचाही समावेश आहे. ब्रिजभूषण यांच्या विरुद्ध याप्रकरणी एफआयआर देखील दाखल झाली आहे.
मात्र, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळेच या प्रकरणात आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने हस्तक्षेप केला आहे. आयोगाने त्यांनी देशातील अनेक क्रीडा संघटनांना लैंगिक शोषण विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. लैंगिक शोषण विरोधी कायद्याचे उल्लंघन हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे खेळाडूंच्या कायदेशीर अधिकार आणि सन्मानावरच गदा येत आहे. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी सर्व क्रीडा संघटनांना चार आठवड्यांचा कालावधीही देण्यात आला आहे.
क्रीडा मंत्रालयाचाही समावेश
बीसीसीआय तसेच साई यांच्यासह आयोगाने केंद्रीय क्रीडा मंत्रालयालाही ही नोटीस बजावली आहे. त्यांनाही चार आठवड्यांच्या कालावधीत उत्तर द्यावे लागणार आहे. तसेच ब्रिजभूषण प्रकरणात पुढे काय कारवाई केली व करणार याबाबतही स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
प्रत्येक संघटनेची नैतिक जबाबदारी
लैंगिक शोषण विरोधी कायदा 2013 अंतर्गत देशातील बीसीसीआयसह प्रत्येक क्रीडा संघटनेत अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापण करणे बंधनकारक आहे. भारतीय कुस्ती महासंघात अशी समिती नसल्याने सरकारने स्टार महिला मुष्टियोद्धा मेरी कोमच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे.
ज्या संघटनेत अशी समिती नसेल तर त्यांना दिलेल्या मुदतीच समिती नियुक्त करावी लागणार आहे. या समितीत चार सदस्य असणे गरजेचे आहे. त्यात दोन सदस्य या महिला असाव्यात असे निर्देश आहेत. एक महिला त्या संस्थेबाहेरील तसेच एखाद्या एनजीओची सदस्य किंवा वकील असणे महत्त्वाचे करण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांचाही जबाब नोंदवून घेतला आहे.