मुंबई : केईएम रुग्णालयातील डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद आत्महत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिस आणि सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजप नेत्यांमध्ये पंकजा मुंडेंच्या स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी यांनी २२ नोव्हेंबरला वरळीतील निवासस्थानी गळफास घेतला. या प्रकरणी अनंत गर्जेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल अटक करण्यात आली असली, तरी गौरीच्या ननंद शीतल आणि दीर अजय यांना अद्याप अटक झालेली नाही. यावर दमानिया यांनी कठोर प्रश्न उपस्थित केले असून, आरोपी वकिलांच्या विधानांना “अब्सुलेटली रबिश” म्हणत त्यांच्यावर संताप व्यक्त केला. दमानिया यांनी गौरीच्या आई-वडिलांशी बोलताना सांगितले की, “आत्ताच्या घटकेला त्यांच्याशी माझे बोलणे झाले. बाकीच्या दोन आरोपींना अटक का झालेली नाही? त्यांना बोलावून स्टेटमेंट घेतले पाहिजे. त्यांच्या बाजूने बोलणारे वकील वाटेल ते बोलताहेत. गौरीच्या आई-वडिलांना २०२१ च्या घटनेबद्दल माहिती होती, असं ते सांगताहेत. पण हे सर्व खोटे आहे. जर माहिती असती तर त्यांनी कधीच लग्न करून दिले नसते. हे वकीलांचे बोलणे अब्सुलेटली रबिश आहे.” या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. गौरीच्या वडिलांनी वरळी पोलिसांना पत्र देऊन ननंद आणि दीरांवर हत्येचा आरोप करत अटकेची मागणी केली आहे. दमानिया यांनी पोलिसांच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले, “सरकारी नोकर आहेत म्हणून अटक होत नाही का? तरीही त्यांना बोलवून स्टेटमेंट घ्या. जे काल तिच्या वडिलांनी म्हटले ते खरे आहे. पोलिस दिरंगाई का करताहेत? ही हाय-प्रोफाइल केस असल्याने गडबड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन टॉवर बिल्डिंगचे पूर्ण दिवसभराचे सीसीटीव्ही फुटेज गौरीच्या पालकांना मिळाले पाहिजे. कोण आले-गेलं हे ते स्वतः पाहू शकतील. त्यांनी पत्र दिले आहे, ते अमलात आणा, असं अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. काय आहे प्रकरण? गौरी आणि अनंत यांचे लग्न फेब्रुवारी २०२५ मध्ये झाले. घर शिफ्टिंगदरम्यान गौरीला अनंतच्या २०२१ च्या गर्भपात कागदपत्रे सापडली, ज्यात किरण इंगळे नावाच्या महिलेचा उल्लेख होता आणि अनंतचं नाव पती म्हणून नमूद होते. यामुळे कौटुंबिक वाद वाढले. गौरीच्या कुटुंबाने हा आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला असून, अनंतने धमक्या दिल्या होत्या. पंकजा मुंडे यांनी पोलिसांना निष्पक्ष तपास करण्याचे निर्देश दिले आहेत, पण दमानिया यांनी मुंडेंच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसरीकडे, दमानिया यांनी पालघरच्या मोखाडा येथील एका प्रसूतीनंतर रुग्णवाहिकेतून अर्धवट रस्त्यात उतरवलेल्या महिलेच्या प्रकरणावरही संताप व्यक्त केला. “त्या चालकाला हृदय आहे की नाही? सी-सेक्शननंतर पोट कापलेले असते, टाके असतात, खूप दुखते. बाळासह महिलेला रस्त्यात सोडून ॲम्बुलन्स घेऊन जाणे हे शॉकिंग आहे. नॉर्मल माणूस असं करणार नाही. सर्व राक्षसी होत चालले आहेत. तिथल्या मेडिकल ऑफिसरने तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी त्यांनी केली.