प्रभात वृत्तसेवा खालापूर – पुणे-मुंबई दृतगती मार्गावर सोमवारी (दि. २४) पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने अचानक नियंत्रण सुटल्यामुळे समोरच्या पिकअप, ट्रक आणि चारचाकीला जोरदार धडक दिली. चार वाहनांच्या या भीषण अपघातात कंटेनरचा चालक जागीच ठार झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर (एमएम ४६ एएफ ००८४) चालक रियाज अहमद (वय ३६) हा मुंबईकडे जात होता. आडोशीतील नवीन बोगद्याजवळ त्याचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि समोरील पिकअप (एमएच ०६ बीडब्ल्यू ६३९१) ला जोरदार धडक दिली. पिकअप पुढे सरकून समोरील ट्रकला (एमएच ०९ इएम ९९५४) धडकल्याने ट्रकने पुढील टाटा पंच कारला (एमएच ०३ बीएफ ६३६०) जोरदार धडक दिली. काही सेकंदांत चार वाहने एकमेंकांवर आदळत भीषण साखळी अपघात झाला. या अपघातात कंटेनरची केबिन पूर्णपणे चिरडली गेली आणि चालक रियाज अहमद जागीच ठार झाला. पिकअपमधील चालक आणि एक प्रवाशी असे दोन जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून खालापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.