चंद्रपूर – महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या काळात कॉंग्रेस पक्ष किंचित होईल, अशी टीका केली होती. त्यावरुन कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला असून त्यांनी, भाजपला चिंतीत केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, धर्मांधतेचे विष पेरत जाती – जाती मध्ये भांडणे लावून लोकशाहीच्या नीतिमूल्यांची गळचेपी करणाऱ्या हुकूमशाही व मनुवादी विचाराच्या भाजपला धडा शिकविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. विधिमंडळाचे पक्ष नेते तथा कॉंग्रेसच्या नागपूर विभागचे निवडणूक प्रमुख आमदार विजय वडेट्टीवार यांनी नागपूर विभागामध्ये बैठकींच्या सत्रांना सुरुवात केली आहे. त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी आढावा बैठकांचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकांमध्ये पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांना वडेट्टीवार यांनी विजयासाठी जनतेच्या मनात स्थान निर्माण करणे हेतू करावयाचे प्रयत्न, पक्षाचे ध्येय धोरण, विचार, आगामी काळात करावयाची विकासकामे, तसेच नागरिकांशी करावयाचा प्रेमळ संवाद याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना त्यांची नाराजी तसेच निवडणुकीत संभाव्य होणारी गटबाजी दूर करत त्यांना विशेष जबाबदारी देऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्यासाठी व पक्षनिष्ठा कायम राखण्याचे आवाहन देखील केले. याप्रसंगी बैठकींना काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.