पाटणा- भारतात काही क्षेत्रे अशी आहेत की वयात आल्यावर मुलगा पित्याची गादी सांभाळतो. त्यांचा वारसा पुढे चालवतो. राजकारण आणि चित्रपटसृष्टीत तर हा नियमच आहे. अर्थात या क्षेत्रात केवळ पित्याच्या पुण्याईमुळे कोणी पुढे जात नाही. मुळात गुणवत्ता असेल तर लोक स्विकारतात. अन्यथा सपशेल नाकारत घरी बसवतात.
या सगळ्याची चर्चा होण्याचे कारण बिहार विधानसभा निवडणुका. बिहारमध्ये रणसंग्राम सुरू आहे. माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुले राजकारणात आहेत. यातील तेजप्रताप काहीसे अनपेक्षित वळणे घेणारे. मात्र तेजस्वी यादव यांना लालूंचा उत्तराधिकारी मानले जाते. काही काळासाठी बिहारचे उपमुख्यमंत्रिपदही त्यांनी भूषवले आहे. आताही तेच राष्ट्रीय जनता दल या पक्षाचा चेहरा आहेत.
रामविलास पासवान हेही बिहारच्या राजकारणातील बडे प्रस्थ. त्यांचे निधन झाले. मात्र त्यापूर्वीच त्यांचे पुत्र चिराग पासवान राजकारणात सक्रिय झाले आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे ते आता सर्वेसर्वा झाले आहेत.
मात्र एक प्रश्न नेहमी मनात डोकावतो. तो म्हणजे नीतीश कुमार यांच्या मुलाचा. त्यांना मुलगा आहे ना आणि तो काय करतो अशी उत्सुकता राजकीय क्षेत्रात विशेष स्वारस्य असणाऱ्यांना नेहमीच असते. तर त्याचे उत्तर आहे नीतीश यांचा मुलगाही सज्ञान आहे. त्यांचे नाव आहे निशांत कुमार.
मात्र निशांत राजकारणात सक्रिय नाहीत. त्यांनी इंजिनिअरींगची पदवी प्राप्त केली आहे. मात्र राजकारणापासून ते कित्येक मैल दूर असतात. त्यात त्यांना रूची नाही व त्याची फारशी माहितीही ठेवत नाहीत.
निशांत कुमार यांचा सुरूवातीपासून अध्यात्माकडे ओढा राहीला आहे. त्यामुळे ते तिकडेच व्यस्त असतात. दरवेळीस निवडणुकीच्या सुमारास निशांत राजकारणात सक्रिय होतील अशा चर्चा सुरू होतात. मात्र त्या लगेचच थांबतात. त्याला कारण निशांत यांनाच स्वत:ला यात नसलेले स्वारस्य.
निवडणुकीच्या वेळी उमेदवार आपल्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देतो. त्यानुसार नीतीश यांची एकूण संपत्ती 56.23 लाख आहे. मात्र निशांत यांची संपत्ती त्यांच्या चारपट म्हणजे 2.43 कोटी आहे.
त्यांच्या मातोश्री मंजू सिन्हा यांच्या निधनानंतर बॅंकेत आणि पोस्टात त्यांच्या नावे असलेली रक्कमही निशांत यांना मिळाली आहे. पिता एका राज्याच्या राजकारणातील पॉवरफुल नेता आहे. देशाच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. बिहारवर त्यांचे दशकभरापासून एकहाती वर्चस्व आहे. असे असताना निशांत यांनी मात्र स्वत:ला राजकारणापासून अलिप्तच ठेवले आहे.