मथुरा –उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मजबूत आघाडी स्थापण्याच्या हालचाली समाजवादी पक्षाने (सप) सुरू केल्या आहेत. त्या पक्षाची सुहेलदेव भारतीय समाज पक्षाशी हातमिळवणी निश्चित झाली. आता राष्ट्रीय लोक दलाच्या (रालोद) रूपाने सपला आणखी एक मित्र मिळण्याची शक्यता आहे.
रालोदचे प्रमुख जयंत चौधरी यांनी सपशी आघाडी करण्याविषयी चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. त्यामुळे सपच्या नेतृत्वाखालील आघाडी हळूहळू आकारास येत असल्याचे दिसते. सप आणि कॉंग्रेस पुन्हा एकत्र येणार का ते अजून स्पष्ट झालेले नाही. उत्तरप्रदेशात प्रसंगी स्वतंत्रपणे लढण्याची तयारीही कॉंग्रेसने चालवली आहे. बहुजन समाज पक्षाने (बसप) याआधीच कुठल्या प्रमुख पक्षाबरोबर आघाडी न करण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांचा विचार करता आघाडी करण्याबाबत सप इतरांच्या पुढे असल्याचे सूचित होत आहे.
उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता आहे. त्या पक्षाविरोधात देशभरात एकवटण्याचा सूर विरोधकांकडून सातत्याने आळवला जातो. मात्र, उत्तरप्रदेशात विरोधक एकवटण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. त्यामुळे त्या राज्यात पुढील काही महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीत बहुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.