नेवासा – बनावट कागदपत्रे सादर करून 17 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे यांच्यासह व्यवस्थापक व इतरांविरुद्ध नेवासा न्यायालयाच्या आदेशानुसार सोनई पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेटे यांनी नेवासा न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी तक्रारीत म्हटले होत की, शनिशिंगणापूर येथील भानुदास यादव बनकर यांची एक हेक्टर दहा गुंठे जमीन असून, त्यांना अनुक्रमे पाराजी व लक्ष्मण अशी दोन मुले आहेत. या दोन्ही बंधूंनी सदरची जमीन चार कोटी रुपयांना विकली आणि त्याची 20 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटीही भरली होती.
त्यापैकी एकाने गोरक्षनाथ काळे यांना वटमुखत्यारपत्र करून दिले. सर्व जमिनींपैकी दोन एकर क्षेत्र नवी दिल्ली येथील हितेश अविनाश चोरडिया यांना विकली. पण चोरडिया काही कारणास्तव नेवासा येथे आले नाही. दरम्यान, या संधीचा फायदा घेऊन वटमुखत्यारपत्र धारक गोरक्षनाथ काळे यांनी सदर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली.
जमीन स्वतःची आहे. असे खोटे भासवून 2020 च्या खरेदी खतामध्ये 2019 सालातील उतारे व कागदपत्र जोडून संत नागेबाबा मल्टीस्टेटमधून एकदा सात कोटी रुपये व दुसऱ्यांदा दहा कोटी रुपये असे मिळून 17 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. याकामी संत नागेबाबा मल्टीस्टेटने कागदपत्रांची कुठलीही शहानिशा न करता कर्ज मंजूर केले. अशी तक्रार नेवासा न्यायालयात केली होती.
याबाबत नेवासा न्यायालयाकडून कागदपत्रांची तपासणी करून नागेबाबा संस्थेचे अध्यक्ष कडुभाऊ काळे, व्यवस्थापक बाळासाहेव टिकल तसेच राजेंद्र गुगळे, राणी राजेंद्र गुगळे, जयराम गोरक्षनाथ काळे, अमोल मनोहर शिंदे यांच्यासह आठ ते दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आदेश दिले होते. यावरून सोनई पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 223/2023 नुसार कलम 420, 467, 468, 471, 120/ब या कलमा अन्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे करीत आहेत.