नवी दिल्ली – आपल्या राजकीय भूमिकेमुळे कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर ही लग्न बंधनात अडकली आहे. लग्नासंदर्भात ट्विट करुन तिने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. स्वराने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याची माहिती आहे.
दोघांच्याही जवळच्या मित्रांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये स्वरा लाल रंगाची साडी परिधान केल्याचे दिसून येत आहे. अधिक माहितीनुसार, स्वराने 6 जानेवारी रोजी लग्न केले आहे.
आंदोलनात झाली मैत्री
फहाद अहमद हे समाजवादी पक्ष युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. 2020 मध्ये एका आंदोलनादरम्यान दोघांची भेट झाली होती. त्यांचा दोघांचा पहिला सेल्फिही आंदोलनादरम्यान घेण्यात आला होता. तर 34 वर्षीय स्वरा भास्करने 2010 मध्ये गुजारिश चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2011 मध्ये आलेल्या तनु वेड्स मनू या चित्रपटाने तिला जबरदस्त ओळख मिळवून दिली.