छत्रपती संभाजीनगर – लोक मला विचारतात की, तुम्ही प्रत्येक मंत्रिमंडळात कसे असता? माझ्या नावात “सत्ता’ असल्यामुळे मी सत्तेत असतो. मी सगळीकडे असतो कारण माझा कुणाशाही पर्मनंट करार नसतो. कारण, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Minorities Minister Abdul Sattar) यांनी केले आहे.
सत्तार पुढे बोलताना म्हणाले की, आम्हाला अपात्र ठरविण्यासाठी दानवे सारखे मागे लागले आहेत. मात्र, एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला त्याची भावना मांडण्याची मुभा असते. म्हणूनच हा देशा लोकशाही आहे. आमच्या डबल इंजिन सरकारला आता तिसरे इंजिन जोडले आहे, असेही यावेळी सत्तार म्हणाले. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे ते कळतच नाही. जे ट्रिपल इंजिन सरकारमध्ये आले त्यांच्या मतदारसंघात कामे सुरू आहेत,’ असा दावाही सत्तार यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (Chhatrapati Sambhajinagar District Central Cooperative Bank) 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी जिल्हा बॅंकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील टोलेबाजी केली आहे. दानवे म्हणाले की, अर्जुन गाढे तुम्ही जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष झालात, पण शिक्काधारी बनू नका. नाही तर सत्तार म्हणतील तिथे मार शिक्का, मार कोंबडा असे करू नका, पुढे काही झाले तर मैं ने तो कुछ नहीं किया, वो तो अर्जुनने किया असे म्हणायला देखील सत्तार मागेपुढे पाहणार नाहीत, असे सांगितल्याने सभागृहात हशा पिकला.
थकीत कर्जवसुली, अनिष्ट तफावत, दुष्काळ जाहीर करा, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या, या मुद्द्यावर ही सभा गाजली. विशेष म्हणजे यावेळी सभेस बॅंकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे, मंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. त्यामुळे या सभेत अनेक नेत्यांनी राजकीय टोलेबाजी करत एकमेकांना खोचक टोलेदेखील लगावले.