कैरो: सूदानच्या अशांत दारफूर टापूत पुन्हा नव्याने दंगली झाल्या असून त्यात किमान साठ जण मरण पावले असल्याची माहिती संयुक्तराष्ट्रांच्या येथील कार्यालयातून देण्यात आली. सूदानमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला या हिंसाचारामुळे खीळ बसण्याचा धोका निर्माण झाला आहे असे संयुक्तराष्ट्रांनी म्हटले आहे.
पश्चिम दारफूर प्रांतात मास्तेरी गावावर पाचशे सशस्त्र लोकांच्या जमावाने शनिवारी अचानक हल्ला केला. तेथे मसलीत जमात आणि अरब जमात यांच्यात हा संघर्ष होऊन मोठा रक्तपात झाला. रविवारी रात्रीपर्यंत दोन्ही जमातींच्या लोकांमध्ये ही चकमक सुरू होती.
स्थानिक अधिकाऱ्यांनी ही चकमक थांबवण्यासाठी तेथे लष्कर पाचारण करण्याची सूचना केली. या हिंसाचाराच्या विरोधात अन्यत्रही निदर्शने सुरू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुदानमध्ये सध्या लष्करी व नागरी प्रतिनिधींची एकत्रित राजवट सुरू आहे. तेथे लोकशाही स्थापनेचे प्रयत्न सुरू असून त्या प्रयत्नांना या हिंसाचारामुळे बाधा निर्माण झाली आहे. सूदानमध्ये सन 2022 पर्यंत सार्वत्रिक निवडणुका घ्याव्यात असा प्रस्ताव आहे.