छोट्या पडद्यावर अनेक मालिकांनी आपला स्वतंत्र चाहतावर्ग तयार केला आहे. या मालिकांमधील रोजच्या घडमोडींकडे प्रेक्षक प्राण कंठाशी आणून लक्ष ठेवून असतात.
अशापैकीच एक कलर्सवरील लोकप्रिय मालिका “छोटी सरदारनी’ने प्रेक्षकांसाठी नेहमीच अनोखी पात्रं आणि पॉवर-पॅक कथानक सादर केले आहे, ज्यामुळे मालिकेमधील ड्रामा व मनोरंजनाचा स्तर उंचावला आहे.
आज मेहेर (निमरित कौर अहलुवालियाने साकारलेली भूमिका) आणि सराब (अविनेश रेखीने साकारलेली भूमिका) यांसारख्या भूमिका घराघरामध्ये लोकप्रिय बनल्या आहेत. प्रेक्षकांनी निश्चितच मालिका पाहण्याचा आनंद घेतलेला आहे आणि मालिका “छोटी सरदारनी’ने नुकतेच पाचशे एपिसोड्सचा टप्पा पूर्ण केला आहे.
आता मेहेर व सराबच्या विवाह सोहळ्याला रोमांचक वळण देण्यासाठी निर्मात्यांनी मालिकेमध्ये नवीन पात्र अमरित कौरला सादर केले आहे. प्रतिभावान अभिनेत्री रिंकू धवन अमरितची भूमिका साकारत आहे. अमरितचा प्रवेश मेहेर व सरबजीतच्या जीवनामध्ये मोठे बदल घडवून आणणार असल्याचे सांगितले जाते आहे.
आपल्या भूमिकेबाबत सांगताना रिंकू म्हणाली, मला “छोटी सरदारनी’ सारख्या लोकप्रिय मालिकेचा भाग असण्याचा आणि कलर्ससोबत काम करण्याचा आनंद होत आहे. अमरित कौर ही भटिंडामधील मोहक व गर्विष्ठ महिला आहे. ती भूमिका मी साकारते आहे. या प्रबळ व विचारशील महिलेला वाटते की, तिच्या कुटुंबाच्या शाही वारसाची ती संरक्षक आहे.
अमरित ही धमाल भूमिका असणार आहे आणि तिचा प्रवेश मालिकेला महत्त्वपूर्ण वळण देण्यासोबत त्यामध्ये रोमांचची भर घालणार आहे. मला खात्री आहे की, मालिकेचे चाहते ती घेऊन येणारे ट्विस्ट्स पाहण्यासाठी उत्सुक असतील.