नेवासा – छत्रपती संभाजीनगर येथील कुटुंबीय आळेफाटा (ता.जुन्नर) येथून नातेवाईकांना घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना नेवासा फाट्याजवळील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार पुलाचे कठडे तोडून ओढ्यात कोसळून झालेल्या भीषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाल्याची घटना रविवारी (दि.29) रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात सुदैवाने तेरा वर्षाची लहान मुलगी सुखरुप बचावली. या अपघातात तीन महिला, एक मुली व चालकाचा मृतांमध्ये समावेश आहे.
आळेफाटा (ता.जुन्नर)येथे नातेवाईकांना भेटून त्यांना घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना नेवासा फाट्यानजीक असलेल्या त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलाजवळ कार (एम.एच.12 ई – टी – 2700) चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. पुलाचे कठडे तोडून कार ओढ्यात कोसळून झालेल्या भीषण अपघात कार चालक वसीम हारुण मुल्ला (रा.मोमीनपुरा ता.जि.छत्रपती संभाजीनगर) हा या अपघातात जागीच ठार झाला.
कारमधील अनसुरा बेगम हारु मुल्ला (वय 41, रा.मोमीनपुरा ता.जि.छत्रपती संभाजीनगर),रेश्मा मोमीन हलदार (वय 35, रा.आळेफाटा), हसीना बेगम हारुण पठाण (वय 54, रा.आळेफाटा), सामीया मोमीन हलदार (वय 11, रा.आळेफाटा ता.जुन्नर) असे या अपघातात मयत झाले. या अपघातातून मासुमा हलदार मोमीन हलदार (वय 13) ही चिमुकली सुदैवाने सुखरुप बचावली.
या अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे व फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी हारुण अमीर मुल्ला (रा.मोमीनपुरा, लोटा करंजा,ता.जि.छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली
..अन् चिमुकली बचावली
या अपघातात स्कोडा कारच्या दरवाजाची एक काच खाली असल्याने तेरा वर्षाची चिमुकली सुखरुप बचावली तर पाच जणांचा पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.