करोना रुग्णाचे नातेवाइक : गाव पूर्णपणे सील; ड्रोनद्वारे टेहळणी
भोर- नेरे (ता. भोर) येथे मंगळवारी (दि. 14) करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या कुटुंबातील 8 व्यक्तींचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या आठही जणांचा तपासणी अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. तर बुधवारी (दि. 15) आणखी नऊ जणांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल रात्रीपर्यंत येण्याची शक्यत आहे. पण या रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्ती निगेटिव्ह असल्याने हे नऊ जणांचा अहवालही निगेटिव्ह येईल, असा विश्वास भोरचे आपत्ती व्यवस्थापना समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार अजित पाटील यांनी व्यक्त केला.
नेरे गाव आणि परिसराची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी करण्यात येत असून शासनाने करोना विषाचा प्रसार रोखण्यासाठीच्या सर्व उपाय योजना राबण्यात येत असून यावर तहसीलदार अजित पाटील आणि भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव हे लक्ष ठेवून आहेत. तहसीलदार पाटील म्हणाले की, आज (गुरुवारी) सकाळीच नेरे गावास भेट देवून पाहणी केली असून संपुर्ण गांवातील बॅंका, दुकाने, व इतर सर्वच व्यवहार ठप्प आहेत. गावात शुकशुकाट पसरला असून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवून आहे.
या गावात करोनाचा रुग्ण सापडला असल्याने गावातील लोकांमध्ये चिंता आहे. माञ परवा ( दि.14) रोजी आढळून आलेला करोना बाधित रुग्ण हा मुंबईवरून दि. 1 एप्रिल रोजी कुटुंबासह आला होता. दरम्यान, गाव सील असल्याने नागरिकांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी 2 ग्रामदूत नेमण्यात आले असून ते जीवनाश्यक साहित्य पुरवण्याचे काम करत आहेत.
प्रशासनाने नेरे गाव आणि तीन किलोमिटरचा परिसर क्वारंटाइन केला असून गावात निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी सुरू आहे, त्याचबरोबर आरोग्य कर्मचार्यांमार्फत सर्वेक्षणाचेही काम सुरुच आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर शासन उपाययोजना करीत असून तालुक्यातील चार हॉस्पिटलमध्ये 56 खाटा विलगीकरणासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी (दि. 15) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी नेरे गावाला भेट देवून काही महत्त्वाचे मार्गदर्शन केले असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले. यावेळी प्राताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे आदी उपस्थित होते.