गडचिरोली – अहेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रमोद शेकोकर असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. शेकोकर यांनी राहत्या घरात रविवारी सायंकाळी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
शेकोकर हे मूळ बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सध्या ते अहेरी येथील पॉवर हाऊस कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होते. मृत शेकोकर यांची पत्नी देखील पोलीस दलामध्ये असून त्या ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहेत. प्रमोद शेकोकर यांनी घरगुती कारणावरून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अहेरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद शेकोकर हे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले होते. सर्वकाही सुरळीत सुरू असताना रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास शेकोकर यांनी आपल्या राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि अहेरीचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद होता. यामुळे पोलिसांनी दुसऱ्या घरामधून शेकोकर यांच्या घरात प्रवेश केला. घरातील चित्र बघून पोलीस देखील हादरून गेले होते.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शेकोकर यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचीमाहिती अद्याप समोर आली नाही. आत्महत्येच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. त्या अनुषंगाने नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. घरगुती कारणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.